GRAMIN SEARCH BANNER

कोर्लेचे सरपंच गणेश साळुंके यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान

Gramin Varta
193 Views

अहिल्यानगर येथे पार पडला पुरस्कार वितरण सोहळा

लांजा : तालुक्यातील कोर्लेचे सरपंच गणेश साळुंके यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार २०२५ गुरुवारी प्रदान करण्यात आला असून पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यामुळे कोर्ले परिसरासह संपूर्ण लांजा तालुक्यातून गणेश साळुंके यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दरवर्षी सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने “मान कर्तृत्वाचा… सन्मान नेतृत्वाचा” या उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सरपंचांचा गौरव करण्यात येतो. यंदा या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी लांजा तालुक्यातील कोर्लेचे सरपंच गणेश जगन्नाथ साळुंके यांची निवड झाली असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

सदर पुरस्कार वितरण सोहळा गुरुवार ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता माऊली संकुल सभागृह, सावेडी रोड, अहिल्यानगर येथे पार पडला. तेथे गणेश साळुंके यांनी पुरस्कार स्वीकारला, त्या सोहळ्यात त्यांच्यासोबत कोर्ले ग्रामपंचायतीचे उपसरपंच मुख्तार साटविलकर, ग्रामविकास अधिकारी तेजस वडवलकर हे देखील सहभागी झाले होते. या सोहळ्याला शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, कालभक्त श्रीमहंत डॉ.श्रीकांतदास धुमाळ महाराज उज्जैन, ग्रामसेवक नेते एकनाथर ढाकणे आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, सरपंच गणेश साळुंके हे आत्मविश्वास, जिद्द आणि कार्यतत्परतेच्या जोरावर ग्रामविकासाचे अनेक उपक्रम राबवून कोर्ले ग्रामपंचायतीला एक आदर्श स्थान मिळवून देण्याचा सतत प्रयत्न करत असतात. तसेच सामाजिक बांधिलकी, लोकसहभाग आणि पारदर्शक कारभार या माध्यमातून त्यांनी ग्रामविकासाचे नवे आदर्श निर्माण केले आहेत.

Total Visitor Counter

3367417
Share This Article