GRAMIN SEARCH BANNER

खेडमध्ये घरदुरुस्तीच्या वादातून मायलेकावर लोखंडी पाईपने हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Gramin Varta
99 Views

खेड: तालुक्यातील हेदली बाजारवाडी येथे कौटुंबिक वादातून मायलेकाला बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

घरदुरुस्तीच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले असून, याप्रकरणी खेड पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ३० मार्च रोजी रात्री १०:३० ते ११:०० च्या सुमारास घडली असून, लोखंडी पाईपने केलेल्या हल्ल्यात आई आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.

फिर्यादी अपर्णा जनार्दन शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, घरातील दुरुस्तीच्या कामावरून कुटुंबात वाद निर्माण झाला होता. हा वाद विकोपाला गेल्याने आरोपी मयूर शिंदे, मयुरी शिंदे, कलावती शिंदे आणि सुप्रिया शिंदे यांनी फिर्यादींना अवाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर थेट शारीरिक हल्ल्यात झाले आणि आरोपींनी लोखंडी पाईपचा वापर करून अपर्णा शिंदे व त्यांच्या मुलावर हल्ला चढवला. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून कौटुंबिक वादातून झालेल्या या हिंसक प्रकाराची चर्चा होत आहे.

याप्रकरणी खेड पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील विविध कलमांनुसार चारही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे. कौटुंबिक कलहातून अशा प्रकारे शस्त्र हाती घेऊन मारहाण केल्याने संबंधित आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. या घटनेने हेदली परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस अधिक माहिती घेत आहेत.

Total Visitor Counter

3391780
Share This Article