रत्नागिरी : पीएम-उषा (PM-USHA) योजनेच्या अंतर्गत येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागामार्फत आयोजित केलेल्या “Certificate Course in Industrial Biotechnology” अभ्यासक्रमाचा लाभ ३० विद्यार्थ्यांनी घेतला.
अभ्यासक्रमात औद्योगिक क्षेत्रांतील तज्ज्ञ संसाधन व्यक्तींनी मार्गदर्शन केले. यामध्येश्री. सौरभ शिंदे (QA व HACCP सुपरवायझर, गद्रे मरीन एक्सपोर्ट प्रा. लि., रत्नागिरी), ओंकार केतकर (व्हेंट्री बायोलॉजिकल्स व्हॅक्सीन रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर, पुणे), बॉस्को बोथेलो (सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे), सिद्धी राउळ (मोलबायो डायग्नोस्टिक्स प्रा. लि., गोवा) आणि प्रीती आंब्रे (टी. जे. मरीन प्रॉडक्ट्स प्रा. लि., रत्नागिरी) यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पीएम-उषा समन्वयक व विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, कार्यक्रम समन्वयक प्रो. डॉ. यास्मीन आवटे, उपक्रम संयोजिका व जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा. रश्मी भावे, प्राध्यापक उपस्थित होते. उद्घाटनपर भाषणात प्रा. रश्मी भावे यांनी जैवतंत्रज्ञान व इतर औद्योगिक क्षेत्रांतील आगामी करिअरच्या संधी लक्षात घेऊन अशा अभ्यासक्रमांची गरज स्पष्ट केली. प्रमुख पाहुणे सौरभ शिंदे यांनी जैवतंत्रज्ञान उद्योगांपर्यंत सुलभ प्रवेश मिळवून देण्यासाठी अशा कार्यशाळांचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. यास्मीन आवटे यांनी शिस्तबद्ध दृष्टिकोन व सातत्याने कौशल्यांचा औद्योगिक क्षेत्रात योग्य वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमातील औद्योगिक जैवतंत्रज्ञानाशी संबंधित तंत्रे व कौशल्ये प्रत्यक्ष औद्योगिक जगाशी सुसंगत करण्याचे महत्त्व नमूद केले. पाच दिवस चाललेल्या या कार्यशाळेत औद्योगिक जैवतंत्रज्ञानातील शैक्षणिक व व्यावहारिक ज्ञानाचे महत्त्व, वाढत्या रोजगार संधी, फर्मेंटरची रचना व कार्यपद्धती, आम्ले, अल्कोहोल व प्रतिजैविके यांसारखी किण्वन उत्पादने, QA व QC संकल्पना, किण्वन उत्पादनांचे डाउनस्ट्रीम प्रोसेसिंग, GMP व GLP, SOP निर्मिती, औद्योगिक जैवतंत्रज्ञानाशी संबंधित कायदे व नियमावली आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेत जैव-औषधनिर्मिती उद्योगाची व्हर्च्युअल लॅब टूरही आयोजित करण्यात आली.कार्यशाळेच्या अंतिम दिवशी सर्व सहभागी विद्यार्थ्यांसाठीटी. जे. मरीन प्रॉडक्ट्स प्रा. लि., रत्नागिरी येथे औद्योगिक भेट आयोजित करण्यात आली. या भेटीद्वारे विद्यार्थ्यांना उद्योगाची प्रत्यक्ष रचना व कार्यपद्धती समजून घेण्याची संधी मिळाली.
समारोप समारंभात सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
रत्नागिरी : तीस विद्यार्थ्यांनी मिळविले औद्योगिक जैवतंत्रज्ञान प्रमाणपत्र







