देवरुख: देवरुख पोलिसांनी शिकारीच्या उद्देशाने बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. पांगरी-घोडवली सीमेवर बुधवारी पहाटे गस्त घालत असताना पोलिसांनी दोन संशयित तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून विनापरवाना बंदूक आणि ७ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध शिकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, देवरुख पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक बुधवारी पहाटे परिसरात गस्त घालत होते. यावेळी सचिन कामेरकर, सचिन पवार आणि अभिषेक वेळवणकर या पोलीस कर्मचाऱ्यांना पांगरी-घोडवलीच्या सीमेवर एका मोटारसायकलवरून दोन तरुण संशयास्पद रित्या फिरताना आढळले. पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली असता त्यांच्याकडे विनापरवाना बंदूक सापडली. वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने हे दोघे परिसरात फिरत असल्याची कबुली तपासादरम्यान समोर आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सूरज आगरे आणि संदीप कातकर या दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून एक बंदूक, ७ जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. पोलीस विभागीय अधिकारी सुरेश कदम यांनी देवरुख पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे. ही विनापरवाना बंदूक आरोपींकडे नेमकी कुठून आली आणि यामध्ये आणखी कोणाचे धागेदोरे आहेत का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.





