GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत उद्यापासून रंगणार आयपीएलचा थरार! स्व. प्रमाेद महाजन क्रीडा संकुलात फॅनपार्कचे आयाेजन, क्रिकेटचा महाकुंभ माेठ्या पडद्यावर अवतरणार

रत्नागिरी : येथील क्रिकेटवेड्या चाहत्यांसाठी एक आनंदाची पर्वणी असून शहरातील स्वर्गीय प्रमाेद महाजन क्रीडा संकुल येथे आयपीएल फॅन पार्कचे आयाेजन करण्यात आले आहे. याद्वारे प्रेक्षकांना घरबसल्या नव्हे, तर थेट मैदानाचा अनुभव 11 व 12 एप्रिल राेजी घेता येणार आहे.

रत्नागिरी येथे आयाेजित पत्रकार परिषदेला बीसीसीआयचे प्रतिनिधी अनंत दातार, रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असाेसिएशनचे सचिव बिपीन बंदरकर, उपाध्यक्ष दीपक देसाई व पदाधिकारी उपस्थित हाेते.
यावर्षीचा टाटा आयपीएल हंगाम पूर्वीपेक्षा अधिक भव्य, अधिक रंजक आणि अधिक आकर्षक स्वरूपात रसिकांसमाेर येत आहे. याच पार्श्वभूमीवर, महाजन क्रीडा संकुलात क्रिकेटचा हा महाकुंभ माेठ्या पडद्यावर पहावयास मिळणार आहे.

या फॅन पार्कचे वैशिष्ट्य म्हणजे येथे येणाऱ्या चाहत्यांना केवळ सामनाच पाहायला मिळणार नाही, तर स्टेडियममध्ये असणारे चैतन्यमय वातावरण अनुभवता येणार आहे. आवडत्या संघाची जर्सी घालून चेहèयावर पेंट केलेले तिरंगी रंग किंवा संघाचे लाेगाे, हातात ध्वज आणि लाडक्या खेळाडूच्या नावाचा जयघाेष अशा वातावरणात रत्नागिरीकर विकेंडचा आनंद लुटू शकतील.या फॅन पार्कमध्ये प्रवेश पूर्णपणे विनामूल्य असून अधिकृत प्रायाेजकांर्ते संगीत, खाद्यपदार्थांचे स्टाॅल आणि विविध खेळांचे आयाेजन करण्यात आले आहे, ज्यामुळे मनाेरंजनाचा उत्साह द्विगुणित हाेणार आहे. देशभरातील 50 शहरांमध्ये अशा प्रकारचे फॅन पार्क उभारले जात आहेत. त्यामध्ये रत्नागिरीचा समावेश हाेणे ही स्थानिकांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या हंगामात देशभरातून 10 लाखांहून अधिक क्रिकेटप्रेमी या उपक्रमात सहभागी हाेतील, अशी अपेक्षा आयाेजकांकडून व्यक्त हाेत आहे.

रत्नागिरीतील या फॅन पार्कमध्ये दाेन दिवस क्रिकेटच्या राेमहर्षक लढती पाहायला मिळतील. शनिवार, 11 एप्रिल राेजी दुपारी 2:30 वाजल्यापासून क्रिकेटचा थरार सुरू हाेईल. या दिवशी पहिला सामना पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार आहे.
त्यानंतरची लढत चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स या बलाढ्य संघांमध्ये हाेणार आहे. त्यानंतर रविवार, 12 एप्रिल राेजी दुपारी 2:30 वाजल्यापासून क्रिकेटप्रेमींना ही पर्वणी अनुभवता येणार आहे. रविवारी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स असा चुरशीचा सामना रंगणार असून, दिवसाचा शेवट मुंबई इंडियन्स आणि राॅयल चॅलेंजर्स बेंगळुरू या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील हाय-व्हाेल्टेज सामन्याने हाेणार आहे.

उत्तुंग षटकार, भेदक गाेलंदाजी आणि हॅट्ट्रिक्सचा साक्षीदार हाेण्यासाठी येथील चाहत्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. खेळाडूंच्या कामगिरीवर टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्ट्यांच्या गजरात आपल्या लाडक्या संघाला पाठिंबा देण्यासाठी आता रत्नागिरीकरांनी सज्ज व्हावे असे आवाहन आयाेजकांकडून करण्यात आले आहे.

लकी ड्राॅ विजेत्याला जर्सी

या फॅनपार्कमध्ये लकी ड्राॅ काढण्यात येणार आहे. या लकी ड्राॅमध्ये विजेत्याला दिग्गज क्रिकेटपटूंच्या सह्या असलेली जर्सी देण्यात येणार आहे अशी माहिती बीसीसीआयचे प्रतिनिधी अनंत दातार यांनी दिली.

Total Visitor Counter

3486653
Share This Article