GRAMIN SEARCH BANNER

आंबा घाटातील दरोड्यातील मुख्य सुत्रधाराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Gramin Varta
316 Views

देवरुख :- रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाट परिसरात बोलेरो चालकाला लुटल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या दरोडा आणि अपहरण प्रकरणातील मुख्य सुत्रधार शागिद गणी बलबले (रा. कोकण नगर , रत्नागिरी) याला देवरुख पोलिसांनी काल रात्री अटक केली. यासह या प्रकरणातील सर्व नऊही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६:३० च्या सुमारास, कोल्हापूर येथील प्रथमेश तानाजी दळवी हे आपल्या बोलेरो गाडीतून वेतोशी (रत्नागिरी) येथून एक म्हैस घेऊन कोल्हापूरच्या दिशेने जात होते. आंबा घाटातील दख्खन परिसरात आले असता, ‘भारत सरकार’ असे स्टिकर लावलेली इनोव्हा आणि एका थार गाडीतून आलेल्या आठ जणांच्या टोळीने त्यांना अडवले.

आरोपींनी दळवी यांना चाकूचा धाक दाखवून बेदम मारहाण केली आणि त्यांचे जबरदस्तीने अपहरण करून इनोव्हा गाडीत बसवले. यावेळी त्यांच्याकडील रोख रक्कमही लुटण्यात आली होती.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रत्नागिरी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तैनात करण्यात आली होती.

पोलिसांनी यापूर्वीच आठ आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. मात्र, मुख्य सुत्रधार आरोपी रत्नागिरीत लपून असल्याची गोपनीय माहिती मिळताच सापळा रचून संशयित शागिद गणी बलबले रा. कोकण नगर. रत्नागिरी याला अटक केली.

अटक करण्यात आलेल्या बलबले या आरोपीला देवरुख पोलिसांच्या ताब्यात असून, न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने अशाच प्रकारचे इतर काही गुन्हे केले आहेत का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3294998
Share This Article