व्यापाऱ्यांनी सोयाबीनची खरेदी ही ४८९२ रुपये प्रतिक्विंटल या शासनाने निश्चित जाहीर केलेल्या आधारभूत दरापेक्षा (एमएसपी) कमी दराने करू नये, अन्यथा कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने दिला आहे.
दरम्यान, व्यापारी वर्गाने आपल्या व्यापार परवान्याचे तातडीने नूतनीकरण करून घ्यावे, अशी नोटीसही कृषी बाजार समितीने बजावलेली आहे.
कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट परवानाधारक व्यापाऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. पांडुरंग भोसले व सचिव संताजी यादव यांनी एक नोटीस काढली आहे. त्यात म्हटले आहे, की कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ नियम १९६७ च्या कलम ३२ ड अन्वये किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने शेतीमालाची खरेदी करण्यास प्रतिबंध करून त्यावरती उपाययोजना करण्याचे अधिकार बाजार समितीस आहेत.
तेव्हा आपण सोयाबीनची खरेदी ही आधारभूत प्रतिक्विंटल ४८९२ रुपये दरापेक्षा कमी दराने करू नये, तसेच शेतीमाल खरेदीनंतर बाजार समितीची अधिकृत काटापट्टी, शेतकरीपट्टी देणे अपेक्षित आहे.