GRAMIN SEARCH BANNER

शेतकऱ्यांनो, ३१ मे पर्यंत ‘फार्मर आयडी’ काढा; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांचे आवाहन

Gramin Search
20 Views

रत्नागिरी: जिल्ह्यातील सर्व प्रलंबित खातेदार आणि पंतप्रधान किसान योजनेतील लाभार्थ्यांनी ३१ मे २०२५ पर्यंत ‘अ‍ॅग्रीस्टॅक’ योजनेत नोंदणी करून आपला ‘फार्मर आयडी’ काढून घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘फार्मर आयडी’ अनिवार्य करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘फार्मर आयडी’ नोंदणी प्रक्रिया
शेतकऱ्यांना  https://mhfr.agristack.gov.in/ या पोर्टलवर स्वतः नोंदणी करता येणार आहे. याव्यतिरिक्त, सीएससी केंद्र (CSC केंद्र) आणि कृषी विभाग, महसूल विभाग तसेच ग्रामविकास विभागातील अधिकारी/कर्मचारी यांच्यामार्फत ग्रामस्तरावर नोंदणीचे काम सुरू असल्याने, त्यांच्याशी संपर्क साधूनही नोंदणी करता येईल, असे सदाफुले यांनी सांगितले.

‘अ‍ॅग्रीस्टॅक’ योजनेची आवश्यकता
महाराष्ट्र शासनामार्फत ‘अ‍ॅग्रीस्टॅक’ योजना १४ ऑक्टोबर २०२४ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेत खातेदार शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास त्यांना ‘फार्मर आयडी’ मिळणार आहे. अकराव्या कृषी गणनेनुसार जिल्ह्यात सुमारे ४ लाख ८७ हजार ९३६ खातेदार आहेत. या योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील २ लाख ११ हजार शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली असून, हे प्रमाण एकूण खातेदारांच्या तुलनेत ४३ टक्के आहे.

पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ७१ हजार ६३६ शेतकऱ्यांची लाभार्थी म्हणून नोंदणी झाली आहे. यापैकी आज अखेर १ लाख २३ हजार १४ लाभार्थ्यांची ‘अ‍ॅग्रीस्टॅक’मध्ये नोंदणी झाली असून, त्याचे प्रमाण ७१ टक्के आहे.

योजनांच्या लाभासाठी ‘फार्मर आयडी’ अनिवार्य
दिनांक ११ एप्रिल २०२५ च्या शासन निर्णयानुसार, पीक विमा, फळपीक विमा योजना, नैसर्गिक आपत्ती पीक नुकसान भरपाई, पंतप्रधान किसान योजना इत्यादी कृषी विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘फार्मर आयडी’ अनिवार्य करण्यात आला आहे. तसेच, केंद्र शासनाने पंतप्रधान किसान योजनेतील लाभार्थ्यांना ‘अ‍ॅग्रीस्टॅक’मध्ये नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. पंतप्रधान किसान पोर्टलवर नवीन स्वयंनोंदणी करण्यासाठी देखील ‘अ‍ॅग्रीस्टॅक’मधील ‘फार्मर आयडी’ बंधनकारक करण्यात आला आहे. यामुळे योजनेतील पुढील २० वा हप्ता ‘अ‍ॅग्रीस्टॅक’मध्ये नोंदणी असलेल्या लाभार्थ्यांनाच दिला जाईल.

प्रलंबित नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन
अद्यापही पंतप्रधान किसानमधील ४८ हजार ६२२ लाभार्थी तसेच एकूण खातेदारांपैकी २ लाख ७६ हजार ९०० खातेदार ‘अ‍ॅग्रीस्टॅक’मध्ये नोंदणी करणे प्रलंबित आहेत. विविध योजनांचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी ३१ मे २०२५ अखेर १०० टक्के नोंदणी करणे आवश्यक आहे.

राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत मुख्यमंत्री, कृषीमंत्री आणि कृषी आयुक्त यांनी शेतकऱ्यांना ‘अ‍ॅग्रीस्टॅक’ योजनेत १०० टक्के नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांनी विहित मुदतीत नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Total Visitor Counter

2648346
Share This Article