GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : साहित्य संस्कृती जागरूक पदभ्रमंती परिक्रमेमुळे पर्यटनाला नवी दिशा

Gramin Varta
29 Views

रत्नागिरी: साहित्य संस्कृती जागरुक पदभ्रमंती परिक्रमेच्या माध्यमातून राजापूर आणि लांजा तालुक्यातील पर्यटनाला नवसंजीवनी मिळणार आहे. ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाच्या जतनासह स्थानिक अर्थव्यवस्थेलाही नवी चालना मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, गुजरात, पुणे, सांगली, कोल्हापूर आदी भागांतून आलेल्या सुमारे ८० पर्यटकांनी या दोन तालुक्यांमधील विविध ऐतिहासिक, धार्मिक आणि प्राचीन स्थळांना भेट देत येथील पर्यटनाचा अभ्यास केला. सहभागी पर्यटकांनी मंदिर संस्कृतीचा धार्मिक ठेवा, राजापूरची प्राचीन समृद्ध व्यापारी बाजारपेठ, शिवकालीन पूल, त्यापलीकडील राजापूरची गढी, ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारी वखारींचे अवशेष तसेच प्राचीन वाडा संस्कृती आणि तिची स्थापत्य रचना यांचा अभ्यास केला. या पदभ्रमंतीमुळे स्थानिक रोजगारालाही चालना मिळाली.

राजापूर शहरातील परिक्रमेमध्ये चहा-नाष्टा, भोजन व्यवस्था, पारंपरिक शीतपेये, रिक्षा वाहतूक, स्थानिक बाजारपेठेतील खरेदी तसेच मांसाहारी भोजन यांमधून एका दिवसात सुमारे ३० हजार रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले. पर्यटनाच्या माध्यमातून राजापूरच्या अर्थकारणाला मोठी संधी उपलब्ध होऊ शकते, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले. पर्यटनाच्या या संकल्पनेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. केवळ ८० पर्यटकांच्या माध्यमातून एवढी आर्थिक उलाढाल होत असेल, तर नियोजनबद्ध पर्यटन मॉडेल उभारून त्याचे प्रभावी सादरीकरण सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर केल्यास भविष्यात राजापूरचा ऐतिहासिक, धार्मिक आणि व्यापारी वारसा आर्थिक विकासाचे मोठे केंद्र ठरू शकतो, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेऊन अभ्यासपूर्ण पर्यटन आराखडा तयार करावा आणि तो प्रभावीपणे जगासमोर मांडावा, असे आवाहन करण्यात आले. यासाठी राजापूरमधील हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

या पदभ्रमंती परिक्रमेचे आयोजन विश्व मराठी साहित्य परिषदेतर्फे करण्यात आले होते. परिषदेचे विजय हटकर यांनी संपूर्ण परिक्रमेचे उत्कृष्ट नियोजन केले. प्रत्येक ऐतिहासिक स्थळाची माहिती, येथील सामाजिक जीवन, परंपरा आणि जीवनपद्धती यांची सविस्तर माहिती त्यांनी सहभागी पर्यटकांना दिली.

या उपक्रमासाठी हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश मयेकर तसेच मंदार बावधनकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या पर्यटकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे राजापूरच्या पर्यटन विकासासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

Total Visitor Counter

3488020
Share This Article