GRAMIN SEARCH BANNER

मुंबईत पहिले राज्यस्तरीय मोडी लिपी संमेलन उत्साहात

Gramin Varta
3 Views

रायगड: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाची ओळख असलेल्या मोडी लिपीच्या संवर्धनासाठी आयोजित करण्यात आलेले पहिले राज्यस्तरीय मोडी लिपी संमेलन – २०२६ मुंबईत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.राज्याच्या विविध भागांतून सुमारे ३०० मोडी लिपी अभ्यासक या संमेलनात सहभागी झाले होते.

संमेलनाचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध मोडी लिपी अभ्यासक व शस्त्र संग्राहक सुनील कदम यांनी भूषविले, तर स्वागताध्यक्ष म्हणून पंकज भोसले उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ट्रस्ट यांच्या सहकार्याने आणि राज्यभरातील मोडी लिपी संवर्धन संस्थांच्या सहभागातून हे संमेलन आयोजित करण्यात आले. संमेलनाचे निमंत्रक आणि मोडी लिपी संवर्धक अमित घाटये यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती दिली.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून करण्यात आली. पहिल्या सत्रात श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ चे सचिव सुधीर थोरात यांनी “मोडी लिपीतून खऱ्या इतिहासाचा मागोवा” या विषयावर मार्गदर्शन केले. मोडी कागदपत्रांमधून महाराष्ट्राचा इतिहास उलगडत असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक ऐतिहासिक दस्तऐवज अजूनही वाचनाच्या प्रतीक्षेत असून नव्या पिढीने इतिहास अभ्यासाकडे वळण्याचे आवाहन त्यांनी केले.

“मोडी लिपीचा युवा संवाद” या चर्चासत्रात डॉ. तेजस लोखंडे यांनी युवा अभ्यासकांशी संवाद साधला. तसेच अनिकेत खाडिलकर, दर्शना वेताळ आणि अंजली तांबे यांनी मोडी लिपी शिकण्याचा अनुभव मांडला. डिजिटल माध्यमांमुळे मोडी लिपीचे भविष्य अधिक उज्ज्वल असल्याचे त्यांनी नमूद केले.

“मोडी लिपी संवर्धन – परिसंवाद” या चर्चासत्रात मोडी प्रशिक्षण, लिप्यंतरण, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर आणि पुराभिलेख अभ्यास यावर सखोल चर्चा झाली. संमेलनाध्यक्ष सुनील कदम यांनी मोडी लिपी ही महाराष्ट्राच्या ऐतिहासिक अस्मितेची ओळख असल्याचे सांगत तिचे संवर्धन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

संमेलनादरम्यान शिवकालीन मोडी कागदपत्रे, मोडी साहित्य आणि कलाकृतींच्या प्रदर्शनालाही मोठा प्रतिसाद मिळाला. मोडी लिपीचे जतन करून तिचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हे संमेलन ऐतिहासिक आणि प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Total Visitor Counter

3380659
Share This Article