GRAMIN SEARCH BANNER

पत्नीला भेटायला गेलेल्या पतीला मुलगा आणि पत्नीकडून बेदम मारहाण; खेडमधील अलसुरे येथील धक्कादायक घटना

खेड: पत्नीला भेटण्यासाठी आणि कौटुंबिक नोटीस देण्यासाठी गेलेल्या पतीला पत्नी, मुलगा आणि अन्य एकाने मिळून बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना खेड तालुक्यातील अलसुरे येथे घडली आहे. या मारहाणीत पती गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी खेड पोलिसांनी पत्नीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विपिन बाबुराव शिर्के (वय ४५, रा. कुसगाव बौद्धवाडी, ता. महाड, जि. रायगड) असे मारहाणीत जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ४ एप्रिल रोजी दुपारी १ ते ३ वाजण्याच्या सुमारास विपिन शिर्के हे आपली पत्नी नयना शिर्के हिला भेटण्यासाठी आणि भावकीने दिलेली नोटीस देण्यासाठी अलसुरे येथे गेले होते. यावेळी काहीही कारण नसताना पत्नी नयना हिने त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याच दरम्यान तेथे उपस्थित असलेल्या बाणा नावाच्या तरुणाने विपिन यांना जमिनीवर पाडले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर गंभीर हाणामारीत होत असतानाच विपिन यांचा मुलगा मंथन शिर्के त्या ठिकाणी आला आणि त्याने हातात असलेल्या काठीने आपल्या वडिलांच्या डाव्या पायावर जोरदार प्रहार केला.

या सामूहिक हल्ल्यात विपिन शिर्के यांच्या डाव्या पायाला आणि खुब्याला गंभीर दुखापत झाली आहे. आपल्याच कुटुंबाकडून झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे. याप्रकरणी खेड पोलिसांनी नयना शिर्के, मंथन शिर्के आणि बाणा (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम ११८(१), ३५१(३), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा (गु.र. क्र. ८८/२०२६) दाखल केला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3486647
Share This Article