GRAMIN SEARCH BANNER

म्हशी धुण्यावरून झालेल्या वादातून बांबूने मारहाण प्रकरणी चौघांना सहा महिन्यांची कैद; राजापूर न्यायालयाचा निकाल

Gramin Varta
158 Views

राजापूर: विहिरीवर म्हशी धुण्यावरून झालेल्या वादातून बांबूने मारहाण करून दुखापत केल्याच्या गुन्ह्यात राजापूर न्यायालयाने चार जणांना प्रत्येकी सहा महिन्यांची साधी कैद आणि एकत्रित १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. राजापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. एस. हाके यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. आत्माराम लक्ष्मण शिंदे, शांताराम लक्ष्मण शिंदे, अनिल आत्माराम शिंदे व अजित आत्माराम शिंदे (सर्व रा. हरळ वारेवाडी, ता. राजापूर) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, आरोपी हरळ वारेवाडी येथील विहिरीवर आपल्या म्हशी धुवत होते. त्यावेळी तक्रारदार प्रतीक प्रभाकर शिंदे यांनी, ‘तुम्ही विहिरीवर म्हशी का धुताय, यामुळे पिण्याचे पाणी पुरणार नाही’, असे सांगितले. या किरकोळ कारणावरून चिडलेल्या आत्माराम शिंदे आणि अनिल शिंदे यांनी प्रतीक यांना बांबूने डोक्यावर, डाव्या हातावर व बोटांवर मारहाण करून दुखापत केली. याच वादात अजित शिंदे यांनी प्रतीक यांची बहीण हेमांगी हिला हाताने मारहाण व धक्काबुक्की करत शिवीगाळ केली, तर शांताराम शिंदे यांनी फिर्यादीचे वडील प्रभाकर शिंदे यांना बांबूने पाठीवर व पायावर मारहाण केली. या घटनेनंतर प्रतीक शिंदे यांनी राजापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपींवर भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तत्कालीन तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र चव्हाण यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यादरम्यान सरकार पक्षाच्या वतीने विशेष सहाय्यक सरकारी वकील ओंकार गांगण यांनी ९ साक्षीदार तपासले, तर सहाय्यक सरकारी वकील भालचंद्र सुपेकर यांनी अंतिम युक्तिवाद केला. कोर्ट पैरवी म्हणून प्रथमेश उकार्डे व सचिन बळीप यांनी कामकाज पाहिले. न्यायालयात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष आणि त्याला पुष्टी देणारे वैद्यकीय प्रमाणपत्र महत्त्वाचे ठरले. याशिवाय फिर्यादीचा रक्तगट, त्याचे कपडे आणि मारहाणीसाठी वापरलेल्या बांबूवरील रक्ताच्या नमुन्यांचा रासायनिक विश्लेषण अहवाल सकारात्मक आला. हा सबळ आणि विश्वासार्ह पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींनी जबर दुखापत केल्याची बाब निःसंशयपणे सिद्ध झाल्याचे निरीक्षण नोंदवले व चौघांनाही कारावासाची शिक्षा सुनावली.

Total Visitor Counter

3485068
Share This Article