GRAMIN SEARCH BANNER

राजापूर: रायपाटणमध्ये ७४ वर्षीय वृद्ध महिला घरात आढळली मृतावस्थेत

Gramin Varta
580 Views

राजापूर/ तुषार पाचलकर: राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील टक्केवाडी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. श्रीमती वैशाली शांताराम शेटे (वय ७४) या वयोवृद्ध महिला त्यांच्या राहत्या घरात अचानक मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच लांजा-राजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम आणि राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. या घटनेमागे घातपाताची शक्यता गृहीत धरून तपास यंत्रणांनी श्वान पथकासह, फॉरेन्सिक टीम आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाला रायपाटणमध्ये पाचारण केले आहे.

रायपाटणमधील टक्केवाडी येथे ही घटना घडली आहे. मृत वैशाली शेटे या घरी एकट्याच राहत होत्या, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. वाडीतील ग्रामस्थांनी त्यांना अखेरचे सोमवारी पाहिले होते. त्यानंतर त्या दिसल्या नाहीत. त्यामुळे बुधवारी सकाळी वाडीतील एका महिलेने त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेरीस, त्या महिलेने धाडसाने जोर लावून दरवाजा लोटला असता, दरवाजा उघडला आणि घरातील भयानक प्रकार समोर आला. घरात वैशाली शेटे या मृतावस्थेत पडलेल्या होत्या.

या घटनेमुळे संपूर्ण टक्केवाडीत आणि रायपाटण परिसरात मोठी खळबळ उडाली. वाडीतील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि रायपाटण पोलीस दूरक्षेत्राला या घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस तात्काळ दाखल झाले. त्यानंतर वरिष्ठांना माहिती मिळताच लांजा-राजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम आणि राजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमित यादव हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. या आकस्मिक मृत्यूच्या मागे काहीतरी अनुचित प्रकार असावा, असा संशय बळावल्याने पोलिसांनी तातडीने फॉरेन्सिक टीम, एलसीबीचे पथक आणि श्वान पथकाला पाचारण केले आहे. श्वान पथकाच्या माध्यमातून घटनास्थळाच्या परिसरातील बारकावे तपासले जात असून, फॉरेन्सिक टीम मृत्यूचे नेमके कारण आणि अन्य पुराव्यांचा शोध घेत आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, नेमका काय प्रकार घडला याचा उलगडा लवकरच होण्याची शक्यता आहे.

Total Visitor Counter

2645210
Share This Article