गावमळा ते कुरधुंडा दरम्यान ठेकेदाराकडून घातक ‘आर.एम.सी.’ रस्त्यावरच सांडले; महामार्ग बनला मृत्यूचा सापळा, वाहनचालकांत तीव्र संताप

saurabhsalvi26
310 Views

संगमेश्वर/ एजाज पटेल: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात ठेकेदार कंपनीच्या बेजबाबदार आणि मनमानी कारभाराचा अगदी कळस झाला आहे. गावमळा ते कुरधुंडा बंदर स्टॉप दरम्यान महामार्गावर ‘आर.एम.सी.’ तयार होऊन आलेले सिमेंट-खडीचे रासायनिक मिश्रण वाहून नेणाऱ्या गाड्यांमधून हे घातक मटेरियल मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरच सांडले आहे. कोणतीही सुरक्षा न बाळगता आणि वाहतुकीचे सर्व नियम पूर्णपणे धाब्यावर बसवून केलेल्या या वाहतुकीमुळे हा संपूर्ण रस्ता आता वाहनचालकांसाठी थेट मृत्यूचा सापळा बनला असून, ठेकेदाराच्या या अक्षम्य निष्काळजीपणामुळे वाहनचालक व जनतेतून तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

ठेकेदार कंपनीच्या ‘आर.एम.सी.’ मिक्सर गाड्यांमधून सांडलेले हे सिमेंट, खडी आणि विविध रसायनांचे धोकादायक मिश्रण आता रस्त्यावरच कडक झाले असून यामुळे रस्त्याची कमालीची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर सांडलेल्या आणि सुकलेल्या या खडी तसेच सिमेंटमुळे दुचाकी व चारचाकी वाहने घसरून भीषण अपघात होण्याचा धोका प्रचंड वाढला आहे. कंत्राटदाराने केवळ आपले खिसे भरण्यासाठीच सर्वसामान्य जनतेचा जीव मुठीत ठेवला आहे का, असा संतप्त आणि धारदार सवाल आता त्रस्त प्रवासी विचारत आहेत.
विशेष म्हणजे, ठेकेदार कंपनीला हे महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी दिलेली मुदत आधीच हुकली असून, पुढील प्रशासकीय कारवाई किंवा दंडापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सध्या कंत्राटदाराकडून कामाची कमालीची घाई केली जात आहे. केवळ ही डेडलाईन गाठण्याच्या अट्टाहासापोटी आणि स्वतःचे मोठे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ठेकेदार कंपनीने अत्यंत बेजबाबदार कारभार सुरू केला आहे. या घाईगडबडीत आणि निष्काळजीपणात सर्वसामान्य जनतेला थेट संकटाच्या खाईत लोटण्याचा प्रकार केला जात असून, याकडे कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही.

अतिशय गंभीर बाब म्हणजे, रस्त्यावर पडलेले हे घातक ‘आर.एम.सी.’ मिश्रण वेळीच उचलण्याची किंवा तो रस्ता साफ करण्याची साधी तसदीही संबंधित ठेकेदार कंपनी किंवा महामार्ग प्राधिकरणाकडून घेण्यात आलेली नाही. वास्तविक पाहता, जेव्हा हे आर.एम.सी. मटेरियल रस्त्यावर ओले असताना सांडले होते, तेव्हाच ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी त्यावर तात्काळ पाणी मारून ते सहज साफ करणे गरजेचे होते, मात्र त्याकडे पूर्णपणे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. आता हे मटेरियल रस्त्यावर कडक सुकल्यानंतर त्याचे अतिसूक्ष्म कण भरधाव वाहनांमुळे हवेत उडत असून, या रासायनिक धुळीमुळे संपूर्ण परिसराला रोगराईच्या कचाट्यात ढकलले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. महामार्ग प्राधिकरणाने यावर तात्काळ पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

- Advertisement -
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *