राजापूर: येथील ऐतिहासिक इंग्रज वखार परिसरातील एक प्राचीन विहीर सध्या इतिहास अभ्यासक आणि संशोधकांच्या विशेष चर्चेचा विषय ठरली असून, तिच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे या वास्तूच्या कालखंडाबाबत नव्याने संशोधनाची गरज अधोरेखित होत आहे. इतिहास अभ्यासक तथा पत्रकार विनोद पवार यांनी नुकतीच हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश मयेकर यांच्या सहकार्याने या विहिरीची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान विहिरीची बांधकामशैली, स्थापत्य वैशिष्ट्ये आणि परिसरातील तटबंदीच्या अवशेषांचा सखोल अभ्यास करण्यात आला. या विहिरीभोवती सुमारे ३० फूट रुंद व २० फूट लांबीचा भाग दगडी बांधकामाने बंदिस्त करण्यात आला असून, त्यात उत्तर व दक्षिण दिशेकडून उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था आहे. पुराच्या पाण्याबरोबर आलेल्या गाळामुळे या संरचनेचा काही भाग सध्या गाडला गेला असला, तरी या बंदिस्त भागाच्या मध्यभागी असलेली विहीर वरून चौकोनी तर तळाशी गोलाकार स्वरूपाची असून ती थेट कातळात खोदून तयार केल्याने स्थापत्य शास्त्राच्या दृष्टीने तिचे महत्त्व अधिकच वाढले आहे.
काही अभ्यासकांच्या मते, या विहिरीची रचना मध्ययुगीन काळातील ‘भद्रा’ प्रकारच्या विहिरींशी साधर्म्य दर्शविते, मात्र कोणताही शिलालेख, ताम्रपट किंवा लेखी पुरावा उपलब्ध नसल्याने केवळ स्थापत्यशैलीच्या आधारे तिचा संबंध कोणत्याही विशिष्ट राजवंशाशी जोडणे योग्य ठरणार नसल्याचे संशोधकांचे मत आहे. इतिहासाच्या नोंदींनुसार मध्ययुगीन काळात कोकण प्रदेशावर शिलाहार आणि यादव राजवटींचे वर्चस्व होते आणि या कालखंडात जलव्यवस्थापन व दगडी बांधकामांचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला असल्याने, या विहिरीच्या वैशिष्ट्यांचा त्या परंपरेशी काही संबंध असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राजापूर हे प्राचीन काळापासून महत्त्वाचे व्यापारी बंदर राहिले असून इंग्रजांनी सतराव्या शतकात येथे वखार उभारण्यापूर्वी स्थानिक गढी, कोट किंवा व्यापारी केंद्र अस्तित्वात असण्याची शक्यता येथील तटबंदीचे अवशेष, खंदकाची रचना, बुरुजांचे संकेत आणि ही प्राचीन विहीर यांमुळे बळावली आहे. पुरातत्त्व विभागाकडून या वास्तूचे शास्त्रीय सर्वेक्षण, तुलनात्मक अभ्यास किंवा उत्खनन झाल्यास राजापूरच्या या प्राचीन वारशावर आणि इतिहासावर अधिक प्रकाश पडू शकतो, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
