ब्रेकिंग : राजापूर ओणी येथे कारला दुचाकीची धडक; दुचाकीस्वार जागीच ठार

saurabhsalvi26
617 Views

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावरील ओणी परिसरात मंगळवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात झारखंडमधील एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत युवक गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मृत युवकाचे नाव जियाउलहक रफीक अन्सारी (वय २७, मूळ रा. झारखंड) असे असून तो राजापूर तालुक्यात बांधकाम क्षेत्रात काम करत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अन्सारी हे दुचाकीवरून लांजा येथून राजापूरकडे निघाले होते. दरम्यान, ओणी येथील पेट्रोलपंपासमोरील मार्गावर त्यांच्या दुचाकीचा कारशी अपघात झाला. या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमी युवकाला राजापूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून अपघाताची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास राजापूर पोलीस करीत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *