स्मार्ट मीटर बसविणाऱ्या ठेकेदार कर्मचाऱ्यांच्या वर्तनाबाबत शिवसेना शिष्टमंडळाची पोलीस अधीक्षकांकडे धाव

Gramin Varta
186 Views

रत्नागिरी : जिल्ह्यात सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेबाबत नागरिकांकडून वाढत्या तक्रारींची दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. स्मार्ट मीटर बसविताना काही ठिकाणी निर्माण होत असलेल्या वादग्रस्त परिस्थिती, नागरिकांच्या तक्रारी तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यातील विविध भागांतून पक्षाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींमध्ये घरातील प्रमुख व्यक्ती अनुपस्थित असताना मीटर बदलण्यात आल्याचे आरोप करण्यात आले आहेत. तसेच काही महिला ग्राहकांनी हरकत घेतल्यानंतर त्यांच्याशी अयोग्य वर्तन झाल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्याचे शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिले. स्मार्ट मीटर योजनेबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या विविध शंका आणि संभ्रमांकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले.

विद्यमान मीटर कार्यरत असताना ते बदलण्याची आवश्यकता काय, ग्राहकांची संमती न घेता मीटर बदलण्याची प्रक्रिया कोणत्या नियमांनुसार राबवली जात आहे, भविष्यात प्रीपेड प्रणाली लागू होणार नाही याची हमी कोण देणार तसेच स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही याची खात्री काय, असे विविध प्रश्न शिष्टमंडळाने उपस्थित केले.

यावेळी दत्ताजी कदम यांनी शिवसेनेचा विरोध तंत्रज्ञानाला नसून जनतेच्या मनातील शंका, संभ्रम आणि संभाव्य अन्यायाला असल्याचे स्पष्ट केले. कोणतीही योजना राबविताना पारदर्शकता, संवाद आणि जनतेचा विश्वास यांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे सांगत नागरिकांचे समाधान न करता राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियांमुळे संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

शिष्टमंडळाने सादर केलेल्या निवेदनात नागरिकांवर दबाव टाकणे, दमदाटी करणे अथवा जबरदस्तीने मीटर बदलण्याच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. तसेच नागरिक आणि स्मार्ट मीटर बसविणारे कर्मचारी यांच्यातील संभाव्य वाद टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची विनंतीही करण्यात आली.

यावेळी पोलीस अधीक्षकांनी पक्षाकडून मांडण्यात आलेल्या तक्रारींची दखल घेत महावितरण तसेच स्मार्ट मीटर बसविणाऱ्या संबंधित ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांविरोधातील तक्रारींची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली.

या भेटीदरम्यान रत्नागिरी शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, युवासेना जिल्हा अधिकारी प्रसाद सावंत, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, उपशहरप्रमुख सलील डाफळे, युवासेना शहर अधिकारी आशिष चव्हाण, विभागप्रमुख प्रशांत सुर्वे, सरफराज शेख तसेच अन्य पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. नागरिकांच्या शंका दूर होईपर्यंत आणि संबंधित यंत्रणांनी स्पष्ट भूमिका मांडून विश्वास निर्माण करेपर्यंत स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेत संयम बाळगावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *