पहिलीची घंटा वाजली, विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जांभरुण शाळेत अवतरला ‘खास कोंबडा’

saurabhsalvi26
153 Views

जांभरुण: नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा जांभरुण नंबर १ चा परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने पुन्हा एकदा गजबजून गेला. यंदाचा पहिला दिवस नवागत विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंददायी आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या संपूर्ण स्वागत सोहळ्यात सर्वांचे मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे एक ‘खास कोंबडा’. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे शाळेत पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्यांच्या मनातील भीती दूर झाली आणि त्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या इयत्ता पहिलीच्या बालमित्रांचे तसेच इतर सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी विविध आनंददायी उपक्रम राबवण्यात आले.

या विशेष प्रसंगी ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. गौतम सावंत, उपसरपंच श्री. मंदार थेराडे, मुख्याध्यापक श्री. संजय कदम, शिक्षक श्री. संतोष रावणंग, सौ. यास्मिन कोतवाल यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. शिक्षण हेच उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन करत सर्व विद्यार्थ्यांनी नियमितपणे शाळेत उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.

शाळेच्या वतीने आयोजित या कल्पक स्वागत सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळेच नवचैतन्य पाहायला मिळाले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले असून, ग्रामस्थांच्या या सक्रिय सहभागाचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे.

- Advertisement -

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *