रत्नागिरीतील ९ बालगृहांमधील १२४ मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप; न्यायिक अधिकाऱ्यांचा सामाजिक पुढाकार

saurabhsalvi26
90 Views

रत्नागिरी : जिल्ह्यातील विविध बालगृहांमध्ये वास्तव्यास असलेल्या मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला ‘बालगृहातील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप समारंभ’ १२ जून रोजी उत्साहात संपन्न झाला. या स्तुत्य उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील ९ बालगृहांमधील १२४ गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि प्रत्येकाने आत्मविश्वासाने आपले भविष्य घडविण्याचे आवाहन केले. मुख्य न्यायदंडाधिकारी एस. एस. पिंगळे यांनी आपल्या मार्गदर्शनात जागतिक बालकामगार विरोधी दिनाचे महत्त्व विशद केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील यांनी या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश स्पष्ट करत, उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. तर रत्नागिरी वकील संघाचे अध्यक्ष विलास एस. पाटणे यांनीही उपस्थित मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे बालगृहातील मुलांनी स्वतः तयार केलेल्या हस्तकला वस्तू व विविध कलाकृतींचे प्रदर्शन ठरले. या प्रदर्शनाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपस्थित मान्यवरांनी मुलांच्या या अफाट सर्जनशीलतेचे कौतुक करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. या सोहळ्याला भोसले, जोशी, जाधव, व्ही. व्ही. पाटील, शेख तसेच के. आर. पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली होती.

या संपूर्ण उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व न्यायिक अधिकाऱ्यांनी एकत्र येत अत्यंत उत्स्फूर्तपणे योगदान दिले आणि हे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे. या मदतीमुळे बालगृहातील मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीला या उपक्रमामुळे नक्कीच नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास लाभणार आहे.

- Advertisement -
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *