रेल्वे पोलिसांतर्फे रत्नागिरी स्थानकात ‘जीवन रक्षा अभियान’ संपन्न

Gramin Varta
91 Views

रत्नागिरी: मुंबई रेल्वे प्रवासादरम्यान रेल्वे ट्रॅक ओलांडताना, तसेच धावत्या गाडीत घाईघाईने चढताना किंवा उतरताना होणारे भीषण अपघात रोखण्यासाठी मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून आज रत्नागिरी रेल्वे स्थानकात ‘जीवन रक्षा अभियान’ अत्यंत यशस्वीपणे राबविण्यात आले. रेल्वे पोलीस ठाण्यातर्फे सकाळी ९ ते ११ या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या विशेष अभियानाला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार निरंजन डावखरे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आपला सक्रिय सहभाग नोंदवला; तसेच रेल्वे पोलिसांच्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि लोकाभिमुख संकल्पनेचे भरभरून कौतुक करत अभियानाला शुभेच्छा दिल्या. रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांच्या निष्काळजीपणामुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो, तर अनेक जण गंभीर जखमी होऊन त्यांना कायमचे अपंगत्व सामोरे जावे लागते, अशा दुर्घटनांना आळा घालून प्रवाशांमध्ये जनजागृती निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

रत्नागिरी रेल्वे स्थानकावर पार पडलेल्या या व्यापक मोहिमेदरम्यान रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण पाडवी, उपनिरीक्षक रविकुमार पाटील, डब्ल्यूपीएसआय आश्विनी धापसे आणि संगीता लोंढे यांनी उपस्थित प्रवाशांना रेल्वे प्रवासातील सुरक्षेचे नियम समजावून सांगत सतर्क राहण्याचे आवाहन केले. या वेळी रेल्वे स्टेशन अधीक्षक श्री. कोवे, रेल्वे सुरक्षा बलचे (RPF) प्रभारी निरीक्षक सतीश विधाते आणि कमर्शियल अधिकारी श्रीमती शुभदा देसाई यांच्यासह रेल्वे पोलीस अंमलदार व होमगार्ड जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रवाशांना सुरक्षित प्रवासाचे महत्त्व पटवून देत, ट्रॅक क्रॉस न करता पादचारी पुलाचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले असून, पोलिसांच्या या सुरक्षा अभियानाचे प्रवाशांकडून स्वागत केले जात आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *