रत्नागिरी शहरातून होणारी फिनोलेक्ससह जड वाहनांची वाहतूक रोखा; मनसेचा आरटीओ प्रशासनाला इशारा

saurabhsalvi26
19 Views

रत्नागिरी: पावस-गोळप रस्तास्थित फिनोलेक्स कंपनीच्या गाड्यांसह शहरातील मुख्य रस्त्यांवरून होणारी सर्व प्रकारची जड व अवजड वाहनांची वाहतूक तात्काळ थांबवण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांना निवेदन देण्यात आले. मनसे तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज आरटीओ अधिकाऱ्यांची भेट घेऊन या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. मागणीची योग्य दखल न घेतल्यास मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी प्रशासनाला देण्यात आला आहे.

शहरातील मुख्य मार्गांवरून सातत्याने धावणाऱ्या या अवजड वाहनांमुळे भूतकाळात अनेक लहान-मोठे आणि गंभीर अपघात घडले आहेत. रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहनचालक आणि पादचाऱ्यांची नेहमीच मोठी वर्दळ असते. त्यातच या मार्गावर शाळा, महाविद्यालये आणि महत्त्वाची शासकीय कार्यालये आहेत. ही परिस्थिती पाहता फिनोलेक्ससारख्या कंपन्यांची अवजड वाहने भविष्यात मोठ्या अपघातांना निमंत्रण देणारी ठरू शकतात, अशी भीती मनसेने निवेदनात व्यक्त केली आहे. मागील अपघातांचे गांभीर्य आणि शहरातील वाहतूक व्यवस्थापनाचा विचार करून या जड वाहनांची ये-जा तातडीने रोखण्याची आग्रही मागणी करण्यात आली.
मनसेच्या या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत, विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन वरिष्ठ आरटीओ अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले. हे निवेदन देताना मनसे तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांच्यासह मनसे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष चैतन्य शेंडे, सर्वेश जाधव, रोहन शेलार, मार्विक नारकर आणि मयुरेश पड्याळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *