खेड : शिवसेना पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने खेड तालुक्यातील तिसंगी येथील आनंदराव दौलतराव भोसले यांची शिवसेना उत्तर रत्नागिरी जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जामगे येथे आयोजित पक्षाच्या कार्यक्रमात शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या नियुक्ती सोहळ्यास शिवसेना उपनेते तथा माजी आमदार संजयराव कदम, जिल्हाप्रमुख शशिकांत (शशी) चव्हाण, चंद्रकांत अण्णा कदम, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, स. तु. कदम, हशमत पारकर, दाऊद हमदुले यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याची प्रेरणा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. संघटनात्मक बांधणी अधिक प्रभावी करण्यासाठी तसेच पक्षाची भूमिका आणि विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी भोसले यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नियुक्तीनंतर आनंदराव भोसले यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी तसेच शिवसेनेचे विचार आणि धोरणे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
भोसले यांच्या नियुक्तीमुळे खेड तालुक्यासह उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पक्ष संघटनात्मकदृष्ट्या अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
आनंदराव भोसले यांची शिवसेना उत्तर रत्नागिरी जिल्हा संघटकपदी नियुक्ती
Leave a Comment
