खेड: वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ चे उल्लंघन करून काही जण ‘अंबरग्रीस’ म्हणजेच देवमाशाच्या उलट्यांची बेकायदेशीर वाहतूक आणि विक्री करणार असल्याची गुप्त माहिती दापोली कस्टम्स विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील खेड रेल्वे स्थानकाजवळ १५ आणि १६ जून २०२६ च्या मध्यरात्रीनंतर, म्हणजेच १६ जूनच्या पहाटेच्या सुमारास एका रेनॉल्ट क्विड कारला अडवून मोठी कारवाई केली.
या कारवाईत कारमधून तब्बल १० किलोपेक्षा जास्त वजनाचे अंबरग्रीस जप्त करण्यात आले असून, हे प्रतिबंधित साहित्य बाळगल्याप्रकरणी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ च्या अनुसूची १ मधील नोंद क्र. १६९ नुसार स्पर्म व्हेल (Sperm Whale) हा संरक्षित प्राणी असल्याने, त्यापासून मिळणारे अंबरग्रीस हे प्रतिबंधित साहित्य मानले जाते. याच कायद्यातील कलम २(३२) आणि कलम १६(क) च्या तरतुदींनुसार सीमाशुल्क विभागाने हा ऐवज जप्त केला आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना खेड येथील माननीय न्यायाधीशांसमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ३० जून २०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच जप्त केलेला मुद्देमाल पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी अधिकृत वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. दापोली कस्टम्सचे अधीक्षक (प्रतिबंधात्मक आणि गुप्तवार्ता) अतुल पोतदार यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक कविता नायर, रविकांत, निरीक्षक प्रतीक अहलावत, धीरज ओझा, नितेश शर्मा, मुख्य हवालदार सुहास विंळणकर, हवालदार करण मेहता, गौरव मौर्य, प्रशांत खोब्रागडे, सुखानी अमित पालशेतकर आणि लॉन्च मेकॅनिक किरण सागावकर यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. दरम्यान, अशा प्रकारच्या कोणत्याही तस्करी संदर्भात माहिती असल्यास नागरिकांनी ८४२११८८७५० या व्हॉट्सॲप किंवा फोन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन कस्टम्स विभागाने केले असून, माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल व त्यांना योग्य बक्षीस दिले जाईल असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
