रत्नागिरी : मारुती मंदिर चौकात एसटी आणि कारचा अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली

Gramin Varta
441 Views

रत्नागिरी: शहरातील अत्यंत गजबजलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारुती मंदिर चौकात आज संध्याकाळी सातच्या सुमारास एसटी बस आणि कार दरम्यान अपघात झाल्याची घटना घडली. रत्नागिरी आगारातून बोरिवलीच्या दिशेने जाण्यासाठी निघालेली एसटी बस (क्र. MH 14 LX 6922) मारुती मंदिर चौक परिसरात आली असता, त्याच दिशेने जाणाऱ्या एका कारने (क्र. MH 08 AG 1134) एसटी बसच्या मागच्या टायरच्या बाजूला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे, मात्र सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. अपघात घडताच मारुती मंदिर परिसरात काही काळासाठी वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता.

परंतु, घटनास्थळी कर्तव्यावर हजर असलेल्या वाहतूक पोलिसांनी अत्यंत तत्परतेने आणि प्रसंगावधानाने परिस्थिती नियंत्रणात आणली. वाहतूक पोलिसांनी घेतलेल्या तातडीच्या भूमिकेमुळे या मुख्य मार्गावर कोणतीही मोठी वाहतूक कोंडी झाली नाही आणि वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात यश आले. दरम्यान, अपघातग्रस्त दोन्ही गाड्यांचे नुकसान झाल्यामुळे सध्या पोलिसांकडून घटनास्थळाचा रीतसर पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील कायदेशीर कार्यवाही केली जात आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *