लांजात जमिनीच्या वादातून तरुणाला ‘ठोंब्या’ने बेदम मारहाण; डंपरखाली चिरडून मारण्याची धमकी, तिघांवर गुन्हा दाखल

Gramin Varta
393 Views

लांजा: तालुक्यातील केळंबे माळवाडी येथे जमिनीच्या वादातून एका ३६ वर्षीय तरुणाला लाकडी ठोंब्याने बेदम मारहाण केल्याची आणि ‘डंपरखाली चिरडून टाकू’ अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी जखमी फिर्यादी प्रसाद चंद्रशेखर जठार (वय ३६ वर्षे, रा. घर नं. १७२, माळवाडी, केळंबे, ता. लांजा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून लांजा पोलिसांनी तिघा संशयित आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी विलास जयसिंग शेलार (वय ४५ वर्षे), शुभम चंद्रशेखर शेलार (वय २५ वर्षे) आणि ओम उर्फ घास चंद्रशेखर शेलार (वय १९ वर्षे, तिन्ही रा. माळवाडी, केळंबे, ता. लांजा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे सांगितली आहेत. ही संपूर्ण घटना १७ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजण्याच्या सुमारास केळंबे माळवाडी येथील जमीन गट क्र. ९२ मध्ये घडली.

पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, यातील संशयित आरोपी जमीन गट क्र. ९२ मध्ये वया (कुंपण) घालत होते. त्यावेळी फिर्यादी प्रसाद जठार यांनी तिथे जाऊन घालत असलेल्या वयाबाबत विचारणा केली. याचा तीव्र राग आल्याने तिन्ही आरोपींनी फिर्यादीच्या अंगावर धावून जात मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपी विलास शेलार याने फिर्यादीची मान पकडली, तर आरोपी शुभम शेलार याने फिर्यादीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेण्यासाठी त्यांचा हात पिरगळला आणि धक्काबुक्की केली. यानंतर संशयितांनी थेट हिंसक वळण घेत आरोपी विलासने आपल्या हातातील खताच्या झाडाचा लाकडी ठोंबा प्रसाद यांच्या पाठीमागून डोक्यात मारला. त्याच वेळी आरोपी शुभमने पाठीमागून कमरेवर आणि आरोपी ओमने पाठीवर लाकडी ठोंबा मारून प्रसाद यांना गंभीर दुखापत केली. मारहाणीनंतर फिर्यादी तिथून निघून जात असताना आरोपींनी त्यांना ढकलत ढकलत वयाच्या गेटच्या बाहेर काढले आणि मुख्य आरोपी विलास शेलार याने “तू यापूर्वी वाचला आहेस, यापुढे तुला डंपरखाली चिरडून टाकीन,” अशी जीवे मारण्याची उघड धमकी दिली.

या मारहाणीत प्रसाद जठार हे जखमी झाले असून त्यांनी तातडीने लांजा पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. या तक्रारीवरून लांजा पोलिसांनी १७ जून २०२६ रोजी रात्री ७.४६ वाजता गुन्हा रजिस्टर क्रमांक १२६/२०२६ नुसार नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) कायद्याच्या कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), १३१, आणि ३(५) अन्वये (तसेच पूर्वीच्या भदंवि कलम ३२४, ३२३, ५०६, ३५२, ३४ प्रमाणे) तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जमिनीच्या वादातून भरदिवसा झालेल्या या बेदम मारहाणीच्या आणि धमकीच्या प्रकारामुळे केळंबे परिसरात कमालीची खळबळजनक परिस्थिती निर्माण झाली असून लांजा पोलीस या प्रकरणाचा पुढील अधिक तपास करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *