संगमेश्वर : तालुक्यातील माखजन परिसरात अखेर भातलावणीला सुरुवात झाली आहे. मात्र, मे महिन्यात सुरू झालेल्या पावसामुळे पेरण्या रखडल्याने यंदा भातलावणीला नेहमीपेक्षा उशीर झाल्याचे चित्र आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
दरवर्षी आषाढी एकादशीपर्यंत भातलावण्या पूर्ण होतात. परंतु यावर्षी भात रोप अपेक्षित वाढले नसल्याने, लावण पूर्ण होण्यास विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या सुरू झालेल्या लावण्या हळू हळू सुरू करण्याच्या हेतूने सुरू झाल्याचे दिसत आहे. रोपांची वाढ अपेक्षेप्रमाणे न झाल्याने भातलावणीचा वेगही मंदावला आहे.
यावर्षी बहुतांश ठिकाणी शेतकरी पॉवर ट्रीलरच्या साहाय्याने चिखलणी करताना दिसत आहेत. दिवसेंदिवस कोकणात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बैलजोड्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. आधुनिक यंत्रांचा वापर वाढत असला तरी, भातलावणीच्या पारंपरिक वेळेत झालेल्या बदलामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन आव्हाने उभी राहिली आहेत. या बदलांमुळे भविष्यात पीक उत्पादनावर काय परिणाम होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.