कुरधुंडा येथे पावसासाठी ‘इस्तिस्का’ नमाज

Gramin Varta
14 Views

सर्वत्र पावसाअभावी निर्माण झालेल्या चिंतेच्या सावटात बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनीच पसरले अल्लाहपुढे हात

संगमेश्वर /एजाज पटेल :जून महिना संपत आला तरी मान्सूनने सर्वत्र पाठ फिरवल्यामुळे देशाच्या आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात चिंतेचे ढग गडद झाले आहेत. कडक ऊन आणि पाण्याच्या वाढत्या टंचाईमुळे एकूणच जनजीवन विस्कळीत झाले असून, पेरण्या खोळंबल्याने जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. सर्वत्र पाण्यासाठी आहाकार माजला असून या गंभीर नैसर्गिक संकटाच्या पार्श्वभूमीवर, निसर्गाची अवकृपा दूर होऊन लवकरात लवकर जलवृष्टी व्हावी यासाठी कुरधुंडा येथील मुस्लिम बांधवांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. गावातील  मशिदीमध्ये एकत्र येत सर्व मुस्लिम समाजाने अल्लाहच्या दरबारात विशेष नमाज अदा केली.

इस्लाम धर्मामध्ये जेव्हा सर्वत्र कडक दुष्काळ पडतो किंवा पावसाअभावी सृष्टी त्रस्त होते, तेव्हा पावसासाठी विशेष प्रार्थना करण्याची परंपरा आहे, ज्याला ‘नमाजे-इस्तिस्का’ असे म्हटले जाते. कुरधुंडा येथील मशिदीमध्ये याच विशेष इस्तिस्का नमाजाचे आयोजन करण्यात आले होते. या नमाजाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या संकटसमयी संपूर्ण समाजातील अबालवृद्ध एकत्र आले होते. अगदी निष्पाप लहान मुलांपासून ते अनुभवाने समृद्ध असलेल्या वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांचीच मशिदीमध्ये मोठी उपस्थिती होती. सर्वांच्याच चेहऱ्यावर पावसाची चिंता आणि डोळ्यांत आशेचा किरण दिसून येत होता.

नमाज संपन्न झाल्यानंतर मशिदीमध्ये उपस्थित सर्व भाविकांनी अत्यंत व्याकुळ अंतःकरणाने अल्लाहकडे दोन्ही हात फैलावून अत्यंत भावनिक दुआ मागितली. “हे अल्लाह, तूच आमचा पालनकर्ता आणि जगाचा रक्षणकर्ता आहेस. आज सर्वत्र धरणी माता तहानलेली आहे, शेतातील माती सुकली आहे, मुकी जनावरे पाण्यासाठी व्याकुळ होऊन आकाशाकडे डोळे लावून बसली आहेत आणि मानवी जीवन हवालदिल झाले आहे. आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या पदरात घे, आमच्यावर दया कर आणि आपल्या रहमतचा, कृपेचा वर्षाव करून या सुकलेल्या सृष्टीला जीवनदान दे. लहान मुलांचे निष्पाप चेहरे आणि वृद्धांची व्याकुळता पाहून तरी या धरणीला तृप्त कर,” अशा अत्यंत भावूक शब्दांत अल्लाहकडे आर्त साकडे घालण्यात आले. बालकांच्या निष्पाप मनातून आणि वृद्धांच्या कंपित सुरातून निघालेली ही सामूहिक दुआ उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आणणारी होती.

निसर्गाच्या या अवकृपेमुळे सर्वत्र निर्माण झालेले संकट दूर व्हावे, या भावनेने मशिदीत झालेली ही गर्दी आणि करण्यात आलेली विशेष इस्तिस्का नमाज सध्या संपूर्ण परिसरात कौतुकाचा विषय ठरली आहे. विज्ञानाच्या प्रयत्नांना जेव्हा श्रद्धेची जोड मिळते, तेव्हा निसर्गही प्रसन्न होतो या विश्वासाने आता सर्वजण चातकासारखी पावसाची वाट पाहत आहेत. अल्लाह ही विशेष भावनिक दुआ नक्कीच कुबूल करेल आणि लवकरच पावसाचे आगमन होऊन सर्वांना दिलासा मिळेल, अशी तीव्र भावना या प्रार्थनेनंतर सर्वांनी व्यक्त केली.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *