गणपतीपुळे/ वैभव पवार : जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या आणि समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचही तरुणांचे मृतदेह शोधण्यात प्रशासनाला अखेर यश आले आहे. पोलीस प्रशासन, कोस्टगार्ड, जीवरक्षक तसेच स्थानिक नागरिकांनी युद्धपातळीवर राबवलेल्या शोधमोहीमेनंतर पाचही जणांचे मृतदेह हाती लागले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गणपतीपुळे परिसरासह बिडकीन गावावर शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये आदित्य संतोष राऊत (वय २२), अनिकेत बंडू हिवराळे (वय २०), आनंद राजू नरवडे (वय २०), प्रेम दीपक आदमाने (वय १९) आणि यश रामेश्वर कांबळे (वय १९) यांचा समावेश असून, सर्वजण बिडकीन (ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील रहिवासी आहेत.
घटनेनंतर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश माईनकर, जयगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय पाटील तसेच कस्टम विभाग, स्थानिक व्यावसायिक, ग्रामस्थ, मच्छिमार आणि जीवरक्षकांच्या मदतीने तातडीने शोधमोहीम सुरू केली होती. समुद्रातील प्रतिकूल परिस्थिती असूनही सलग प्रयत्न सुरू ठेवण्यात आले. अखेर अथक प्रयत्नांनंतर पाचही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
दरम्यान, या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पर्यटकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. समुद्राची धोकादायक स्थिती लक्षात घेता पर्यटकांनी समुद्रस्नानासाठी पाण्यात उतरू नये तसेच सुरक्षा नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जीवितहानी टाळण्यासाठी समुद्राचा आनंद सुरक्षित अंतरावरूनच घ्यावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
गणपतीपुळे दुर्घटना : बेपत्ता पाचही तरुणांचे मृतदेह सापडले
Leave a Comment
