रत्नागिरी: मदतीचा हात पुढे करणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील उमरे येथील एका ५२ वर्षीय प्रौढाला संभाषणाची ध्वनिमुद्रिका नातेवाईक आणि मित्रांना ऐकवण्याची व बदनामी करण्याची धमकी देत तब्बल १७ लाख ९ हजार ४९४ रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीत उघडकीस आला आहे.
या प्रकरणी रामचंद्र चिंतामणी केळकर (वय ५२, रा. उमरे, ता. रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी एका महिलेसह चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३(५), ३०८(२) आणि ३०८(५) अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. सुरैय्या हकीम, हुसैन नाईक, अंजर हकीम आणि अरफान हकीम (सर्व रा. रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे असून, शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार २२ जुलै २०२५ ते १९ मे २०२६ या कालावधीत घडला. तक्रारदार रामचंद्र केळकर हे २२ जुलै रोजी शहरातील एका रुग्णालयात आपल्या भावाला भेटण्यासाठी गेले होते. तिथे त्यांना सुरैय्या हकीम ही महिला रडताना दिसली. केळकर यांनी विचारपूस केली असता, तिने मुलाच्या ऑपरेशनचे बिल भरण्यासाठी पैसे नसल्याचे रडत सांगितले. त्यावर केळकर यांनी मदतीचे आश्वासन देत आपला मोबाईल क्रमांक तिला दिला. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी सुरैय्या हिने फोन करून आर्थिक मदतीची मागणी केल्यावर केळकर यांनी मारुती मंदिर परिसरात तिची भेट घेऊन १,५०० रुपये रोख आणि नंतर गुगल पे द्वारे ५०० रुपये पाठवले. मात्र, याच मदतीचा गैरफायदा घेत दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच २३ जुलै रोजी, सुरैय्याच्या मोबाईलवरून एका पुरुषाने केळकर यांना फोन केला. “तुमचे आणि सुरैय्याचे संभाषण आम्ही रेकॉर्ड केले असून, बदनामी टाळायची असेल तर १० हजार रुपये द्या,” अशी धमकी दिली. बदनामीच्या भीतीने घाबरलेल्या केळकर यांनी तातडीने १० हजार रुपये ऑनलाइन पाठवले.
यानंतर संशयित आरोपींनी केळकर यांना सातत्याने फोन करून हे संभाषण नातेवाईक व मित्रपरिवारात व्हायरल करण्याची धमकी दिली आणि वारंवार पैशांची मागणी केली. या सततच्या धमक्यांमुळे मानसिक दडपणाखाली आलेल्या केळकर यांनी वर्षभरात विविध व्यवहारांद्वारे एकूण १७ लाख ९ हजार ४९४ रुपये आरोपींच्या गुगल पे क्रमांकावर पाठवले. अखेर या त्रासाला आणि सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून केळकर यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सुरैय्या हकीमसह चौघांना अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.
