देवरुख: संगमेश्वर तालुक्यातील बामणोली येथे देवरुख डेपोच्या ‘जिजाऊ’ एसटी बसला एका डंपरने जोरदार धडक दिल्याची घटना गुरुवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हा अपघात इतका विचित्र होता की यामध्ये एसटी बसची काच फुटून मोठे नुकसान झाले आहे, मात्र सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही. देवरुख बसस्थानकातून देवरुख ते बामणोली ही एसटी बस (क्र. एमएच १४ एनई ४६२९) दुपारी १२ वाजता प्रवाशांना घेऊन सुटली होती. बामणोली येथे प्रवाशांना सोडून ही बस पुन्हा देवरुखच्या दिशेने परतत असताना समोरून बामणोलीच्या दिशेने जाणाऱ्या एका डंपरने (क्र. एमएच ३१ एफसी ११४३) या बसला हुलकावणी देत धडक दिली.
या धडकेमुळे बसच्या समोरील बाजूचे नुकसान झाले असून काच पूर्णपणे फुटली आहे. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे अन्य कोणतेही गंभीर नुकसान झाले नाही आणि बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित राहिले. अपघातानंतर दोन्ही वाहने म्हणजेच एसटी बस आणि डंपर देवरुख पोलीस ठाण्यासमोर आणण्यात आले असून पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर कार्यवाही करत आहेत. हा अपघात केवळ येथील अत्यंत अरुंद रस्त्यामुळे घडल्याचे सांगण्यात येत असून या मार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे.
