रेल्वेमंत्र्यांच्या आदेशालाही केराची टोपली; दादर-रत्नागिरी पॅसेंजरबाबत प्रशासनाची अनास्था कायम

Gramin Varta
309 Views

मुंबई: दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा पूर्वीप्रमाणे दादरवरून सुरू करण्याबाबत रेल्वेमंत्र्यांनी दिलेले आदेश रेल्वे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हवेतच विरले आहेत. एप्रिल महिन्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या गाडीची तांत्रिक व्यवहार्यता तपासण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते, मात्र दोन महिने उलटूनही मध्य रेल्वेने यावर कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. कोरोना काळात बंद पडलेली आणि सध्या दिवा-रत्नागिरी दरम्यान मर्यादित केलेली ही गाडी मूळ वेळापत्रकानुसार दादर स्थानकापर्यंत चालवावी, ही कोकणवासीयांची अनेक वर्षांची मागणी आहे.

या मागणीकडे रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी संघटनांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. दादर स्थानकावर जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत प्रशासन या महत्त्वपूर्ण गाडीला खो देत आहे, तर दुसरीकडे दादर-गोरखपूरसारख्या गाड्यांना कायमस्वरूपी मंजुरी देऊन कोकणच्या प्रवाशांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप होत आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने स्पष्ट केले आहे की, गाडी चालवण्यास त्यांच्या मार्गावर कोणतीही अडचण नाही आणि सर्व तांत्रिक अडथळे मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात आहेत. प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे आता कोकण विकास समितीसारख्या संघटना आक्रमक झाल्या असून, मध्य रेल्वेच्या हद्दीतून येणाऱ्या इतर महत्त्वाच्या गाड्यांनाही सावंतवाडी किंवा थिवीपर्यंतच मर्यादित करण्याचा इशारा दिला जात आहे. प्रवाशांच्या हक्काच्या या गाडीसाठी रेल्वे प्रशासनाच्या पातळीवर होत असलेला विलंब कोकणवासीयांसाठी मनस्तापाचा विषय ठरत आहे.

Total Visitors :
4826823
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *