नवी दिल्ली : मध्य पूर्वेतून भारताकडे येणारी ३० मालवाहू जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे बाहेर पडली असून, भारताच्या ऊर्जा आणि व्यापारी सुरक्षेच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. नौवहन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या जहाजांमध्ये प्रामुख्याने एलपीजी, एलएनजी, कच्चे तेल आणि मोठ्या प्रमाणावर बल्क कार्गोचा समावेश होता. इराण आणि अमेरिका यांच्यातील सामंजस्य करारानंतर या सागरी मार्गावरील तणाव काहीसा निवळल्याने जहाजांच्या वाहतुकीला वेग आला आहे. दरम्यान, अद्यापही २६ जहाजे या अरुंद आणि संवेदनशील सागरी मार्गावरून जाण्यासाठी आपल्या क्रमांकाची वाट पाहत आहेत.
होर्मुझ सामुद्रधुनी हा जागतिक ऊर्जा पुरवठ्यातील अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून, इथूनच जगातील पाचवा हिस्सा ऊर्जा वाहतूक केली जाते. भारताच्या एलएनजी आणि एलपीजी आयातीसाठी हा मार्ग जीवनवाहिनी ठरतो. सध्या फारसच्या आखातात भारताच्या हिताशी संबंधित २६ जहाजे तैनात असून, यामध्ये खते, ऊर्जा उत्पादने आणि इतर मालाची ने-आण करणारी जहाजे समाविष्ट आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव या जहाजांच्या प्रवासावर नौवहन मंत्रालयाचे बारीक लक्ष असून, भारतीय आणि परदेशी ध्वजांकित जहाजांचा हा ताफा वेळेत बंदरांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
