कोकणातील वाया जाणारे पाणी बोगद्याद्वारे दुष्काळप्रवण भागात वळवणार; ३० ते ४० हजार कोटींच्या महत्त्वाकांक्षी योजनेची चर्चा

Gramin Varta
157 Views

कोल्हापूर : कोकण किनारपट्टीवरून समुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवून ते बोगद्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दुष्काळी भागाकडे वळवण्याची एक महत्त्वपूर्ण योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत समुद्रसपाटीपासून ५७५ ते ५८५ मीटर उंचीवर ७०० ते १००० किलोमीटर लांबीचा एक भव्य काँक्रीट कॅनॉल तयार करून त्याद्वारे हे पाणी राज्याच्या उर्वरित भागात पोहोचवण्याचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ३० ते ४० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, यामुळे राज्याची पाणी साठवण क्षमता ५०० ते ७०० टीएमसीने वाढू शकते, असा दावा या योजनेचे जनक पी. एन. तोडकर यांनी केला आहे.

या योजनेच्या आराखड्यानुसार, कोकणातील गोव्याच्या सीमेपासून गुजरातच्या सीमेपर्यंत पसरलेल्या या कॅनॉलला सहा मुख्य बोगदे जोडले जाणार आहेत. हे बोगदे राधानगरी, कोयना, वीर, खडकवासला, घोड आणि दारणा धरणांशी जोडले जातील. या माध्यमातून अतिरिक्त पाणी पंचगंगा, कृष्णा, वारणा आणि नीरा नदीपात्रांत सोडून ते सांगली, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर आणि मराठवाड्याच्या दुष्काळी भागापर्यंत पोहोचवता येणार आहे. या सहा बोगद्यांची एकूण लांबी साधारणतः ५० किलोमीटर इतकी असेल. या योजनेमुळे कोकणातील किमान ५०० ते १६०० टीएमसी पाणी अडवणे शक्य होणार असून, राज्याला दुष्काळाच्या झळांपासून कायमची मुक्ती मिळू शकते.

दरम्यान, शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथदादा पाटील यांनी या प्रकल्पाचे जोरदार समर्थन केले आहे. शासनाकडून अनेकदा अनावश्यक रस्त्यांवर आणि प्रकल्पांवर हजारो कोटींची उधळपट्टी केली जाते, त्याऐवजी हा निधी या जलसिंचन योजनेसाठी वापरल्यास शेतकऱ्यांचे मोठे भले होईल. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास राज्यातील बहुतांश तालुके दुष्काळमुक्त होतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे सरकारने ही योजना अत्यंत गांभीर्याने घेऊन तातडीने राबवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *