मुंबई : राज्यातील नागरिकांना अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत ‘डेटा-आधारित’ प्रशासनाची दिशा निश्चित केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध डिजिटल उपक्रमांचे लोकार्पण करण्यात आले असून, यामध्ये महा एआय (Maha-AI), महाडीबीटी २.०, आपले सरकार सेवा केंद्रांचे मानांकीकरण आणि डिजिटल हयातीचा दाखला यांसारख्या महत्त्वाच्या प्रणालींचा समावेश आहे. राज्याच्या डिजिटल प्रवासातील हे पाऊल प्रशासनात आमूलाग्र बदल घडवून आणणारे ठरणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उपक्रमांचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, महासारथीच्या माध्यमातून तयार झालेला एकात्मिक डेटा पूल केवळ योजनांची अचूक अंमलबजावणी करण्यासाठीच नव्हे, तर भविष्यातील नियोजनासाठीही गेमचेंजर ठरणार आहे. या प्रणालीमुळे लाभार्थ्यांचे डुप्लिकेशन टाळून पात्र नागरिकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय थेट लाभ देणे शक्य होईल. महाडीबीटी २.० च्या माध्यमातून सर्व विभागांच्या योजना आता एकाच व्यासपीठावर येणार असून, अर्जातील माहितीची गुंतागुंत कमी करून ती अधिक सुटसुटीत करण्यात आली आहे.
ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांसाठी डिजिटल हयातीचा दाखला ही एक मोठी दिलासादायक सुविधा ठरली आहे. आता लाभार्थ्यांना दाखल्यासाठी वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत. तसेच, राज्यातील ३१ हजारांहून अधिक आपले सरकार सेवा केंद्रांचे मानांकीकरण करून त्यांना अधिक सक्षम आणि गुणवत्तापूर्ण बनविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या केंद्रांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य, विभाग आणि जिल्हास्तरावर पुरस्कार देऊन त्यांची कार्यक्षमता वाढविली जाणार आहे.
एनआयसीच्या सहकार्याने विकसित केलेले ‘महा एआय’ मॉडेल हे देशातील पहिलाच अभिनव उपक्रम असून, याद्वारे शासनाचा डेटा सुरक्षितपणे वापरून प्रशासकीय निर्णय प्रक्रिया अधिक गतिमान केली जाईल. सायबर धोक्यांपासून संरक्षण देण्यासोबतच, हे एआय मॉडेल प्रशासनाला अधिक लोकाभिमुख आणि प्रतिसादक्षम बनविण्यास मदत करेल. या उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संबंधित सर्व विभागांनी आणि अधिकाऱ्यांनी नियमित वापराचा संकल्प करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्यासह राज्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि जिल्हा स्तरावरील यंत्रणा उपस्थित होती.
