शेतकरी कुटुंबांच्या लग्नासाठी आता एसटी बसची सेवा; सवलतीच्या दरात मिळणार सुविधा

Gramin Varta
103 Views

मुंबई : राज्यातील शेतकरी कुटुंबांना लग्न समारंभ आणि शुभकार्यांसाठी आता सवलतीच्या दरात एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. शेतकरी कुटुंबात होणाऱ्या विवाहांसाठी वऱ्हाडाच्या प्रवासासाठी ट्रक किंवा डंपरसारख्या असुरक्षित व अवैध वाहनांचा वापर टाळावा, या उद्देशाने परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत ही मोठी घोषणा केली. एसटी महामंडळाकडे नवीन बसचा ताफा दाखल झाल्यानंतर, शेतकरी कुटुंबांच्या मागणीनुसार एसटी बस थेट त्यांच्या घरापर्यंत पाठवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारने उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर वाढलेला ताण पाहता, राज्य सरकारने ८,३०० नवीन एसटी बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन बसेस टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल होत असून, यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. काही महत्त्वाच्या मार्गांवर सध्या तासाला असलेल्या बस फेऱ्या पुढील काही महिन्यांत दर अर्ध्या तासाला उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत त्यांचे परवाने रद्द करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. एसटीच्या या सुविधेमुळे ग्रामीण भागातील गरीब आणि मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून, लग्नसराईत होणारी जीवघेणी वाहतूक या निर्णयामुळे कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *