मुंबई: राज्यात ट्रिपल तलाक प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल आणि कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ठाम ग्वाही गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. मुस्लिम महिलांवरील अन्यायाच्या घटनांकडे शासन अत्यंत संवेदनशीलतेने पाहत असून पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन सक्षमपणे कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा सदस्य देवयानी फरांदे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. या चर्चेत सदस्य सना मलिक, अतुल भातखळकर, जयंत पाटील, मनीषा चौधरी, भास्कर जाधव आणि सुधीर मुनगंटीवार यांनी सहभाग घेतला.
सर्व धर्मीयांना समान न्याय देण्याची शासनाची भूमिका असून कायद्याची अंमलबजावणी ही सर्व नागरिकांसाठी समान न्याय सुनिश्चित करण्यासाठी आहे. या प्रश्नाकडे राजकारण किंवा धार्मिक दृष्टिकोनातून न पाहता महिलांच्या न्यायाच्या दृष्टीने पाहिले पाहिजे, असे कदम यांनी नमूद केले. केंद्र शासनाने लागू केलेल्या ट्रिपल तलाक प्रतिबंधक कायद्यामुळे फोन, संदेश किंवा ई-मेलद्वारे तलाक देण्यास प्रतिबंध करण्यात आला असून या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे.
यावेळी राज्यमंत्र्यांनी नाशिकमधील एका गंभीर घटनेचा संदर्भ दिला. ८ मे २०२६ रोजी नाशिकमध्ये एका महिलेने तिच्या पतीकडून फोनवर तलाक दिल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर संबंधिताविरोधात गुन्हा दाखल होताच अवघ्या आठ दिवसांत त्या महिलेवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणातही तातडीने गुन्हा दाखल करून संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे. राज्यातील ट्रिपल तलाकच्या तक्रारींची आकडेवारी मांडताना कदम यांनी सांगितले की, २०२४ मध्ये अशा स्वरूपाचे ४२ गुन्हे दाखल झाले असून सर्व तक्रारी सत्य असल्याचे निष्पन्न झाले आणि यात १५२ आरोपींवर कारवाई करण्यात आली. तर २०२५ मध्ये ३९ गुन्हे दाखल झाले असून १३७ आरोपींवर कारवाई करत ९५ जणांना अटक करण्यात आली आहे.
समान नागरी कायदा (यूसीसी) लागू करण्याबाबतही राज्य शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या विषयाच्या मसुदा, अभ्यास आणि अभिप्रायासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्यात यूसीसी लागू करण्याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल. बहुपत्नीत्वाच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले की, यूसीसी लागू झाल्यानंतर विवाहविषयक समान नियमांची अंमलबजावणी करण्यात येईल. त्यावेळी बहुपत्नीत्वासंदर्भातील आवश्यक तरतुदी आणि निर्बंधांचाही नक्कीच विचार केला जाईल. मुस्लिम महिलांना संरक्षण आणि न्याय देण्याबाबत सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे राज्यमंत्री कदम यांनी शेवटी आश्वस्त केले.
