“ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है”- एकनाथ शिंदे

Gramin Varta
128 Views

स्थापना दिनाला ठाकरे गटाचे नाव न घेता दिला इशारा

मुंबई: राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत शिवसेनेच्या उबाठा गटातील काही खासदार आणि नेते फुटून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त गोरेगाव येथे आयोजित मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

स्थापना दिवस सभेत शिंदे यांनी ‘ऑपरेशन टायगर’चा थेट उल्लेख टाळला, मात्र आपल्या भाषणातून विरोधकांना लक्ष्य केले. “आज ये टायगर आपके सामने खडा है. काल-परवापासून काही जण सतत टीका करत आहेत. कुत्ते झुंड में आके भोंकते है, शेर अकेला आता है,” असे म्हणत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. पुढे ते म्हणाले की, “कुत्ते भोंकते रहते है, टायगर शिकार करता है. कुत्ते भोंकते रहते है और टायगर दहाडता है. वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणारी हीच खरी शिवसेना आहे. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है,” असे वक्तव्य करत त्यांनी भविष्यात आणखी राजकीय घडामोडी होण्याचे संकेत दिले.शिवसेनेच्या स्थापनेचा उद्देश मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी असल्याचे सांगत शिंदे यांनी पक्षाच्या कार्याचा गौरव केला. “मराठीचा निर्धार, देशद्रोह्यांवर प्रहार, लाडक्या बहिणींचा स्वाभिमान, शेतकऱ्यांचा तारणहार आणि वारकऱ्यांचा जयजयकार म्हणजे शिवसेना असे शिंदे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना शिंदे म्हणाले की, मी डॉक्टर नसलो तरी अजूनही ऑपरेशन करतो. ऑपरेशन करायला वाघाचे काळीज लागते, लांडग्याचे नाही. लांडग्याला कातडं पांघरून वाघ होता येत नसल्याचा टोला देखील शिंदेंनी लगावला. तसेच 4 वर्षांपूर्वी झालेल्या राजकीय संघर्षाचाही उल्लेख करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “त्यावेळी मला धमक्या दिल्या गेल्या होत्या. मात्र मी एकटाच मुंबईत आलो, रस्त्याने प्रवास केला आणि कुणालाही घाबरलो नाही. आम्हाला चॅलेंज देणाऱ्यांनी आधी स्वतःची ताकद पाहावी,” असे शिंदे यांनी सांगितले.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *