राज्यात पावसाचा जोर वाढणार; २४ ते २७ जूनदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा

Gramin Varta
102 Views

मुंबई: भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात मान्सूनच्या सक्रियतेसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून, आगामी २४ ते २७ जून या काळात कोकण किनारपट्टीसह राज्याच्या अंतर्गत भागात पावसाचा जोर अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली असून, पुढील दोन-तीन दिवसांत पावसाचे प्रमाण अधिक वाढणार आहे. सायन परिसरातील वाहतूक कोंडीच्या घटनेने शहराच्या व्यस्त जीवनावर पावसाचा परिणाम दिसून आला असला, तरी हवामान विभागाने पुढील ४८ तासांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करत सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

कोकण पट्ट्यातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन बदलले आहे. रायगडमधील माणगाव, म्हसळा, महाड आणि पोलादपूरमध्ये पावसाच्या सरी बरसत आहेत, तर दापोलीत दमदार पावसाने भातशेतीला नवसंजीवनी दिल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सरासरी ८०.८७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, देवगडमध्ये १२६ मिलिमीटर पावसाचा उच्चांक गाठला आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने ओढे-नाले दुथडी भरून वाहत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील पाच दिवस मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा असल्याने प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय योजले जात असून, जुलैच्या पहिल्या आठवड्यातही पावसाचा हाच जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *