गुजरात-महाराष्ट्र सीमेवर राज्यस्तरीय दक्षता पथकाचा मोठा ‘सर्जिकल स्ट्राईक’

Gramin Varta
135 Views

तब्बल १.५५ कोटींचा अवैध एलपीजी आणि डिझेल साठा जप्त करत आंतरराज्यीय तस्करीचे रॅकेट उघड

मुंबई: गुजरात राज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या इंधन आणि एलपीजी गॅसच्या आंतरराज्यीय काळ्याबाजाराचा व मोठ्या तस्करीचा अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने पर्दाफाश केला आहे. दक्षता पथकाचे प्रमुख चंद्रकांत डांगे यांना मिळालेल्या खात्रीलायक गुप्त माहितीच्या आधारे, गुजरात-धुळे महामार्गावरील धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दहिवलगाव येथील अन्नपूर्णा धाब्याच्या मागे आणि पार्श्वनाथ धाब्याच्या शेजारी सुरू असलेल्या एका अवैध अड्ड्यावर अचानक छापा टाकण्यात आला. या धडक कारवाईत पथकाने तब्बल १ कोटी ५५ लाख ९५ हजार ११४ रुपये किमतीचे दोन मोठे टँकर, तस्करीसाठी वापरण्यात येणारी वाहने आणि व्यावसायिक तसेच घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर्सचा मोठा साठा जप्त केला आहे. राज्यस्तरीय दक्षता पथकाच्या या धडक कारवाईमुळे गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात इंधनाची काळी कमाई करणाऱ्या आंतरराज्यीय तस्करांचे एक मोठे रॅकेट समोर आले असून संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित भरारी पथकाने घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल हस्तगत केला असून यामध्ये ५५ लाख ६७ हजार ८४४ रुपये किमतीचा १७.४२० मेट्रिक टन एलपीजी गॅस आणि टँकर (क्रमांक GJ-06-AZ-4430), तसेच ७६ लाख ७२ हजार रुपये किमतीचे ३५ हजार लिटर डिझेल, ड्रममधील ३०० लिटर डिझेल व डिझेल टँकर (क्रमांक GJ-12-BZ-7999) यांचा प्रामुख्याने समावेश आहे. याशिवाय तस्करीच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ८ लाख ३५ हजार रुपये किमतीची बोलेरो पिकअप (क्रमांक MP-09-BH-9914), ४ लाख ५० हजार रुपये किमतीचा आयशर छोटा ट्रक (क्रमांक MH१९-BM-5356) आणि ३ लाख ३० हजार २७० रुपये किमतीचे १९ किलो व १४.२ किलो वजनाचे एकूण १३० व्यावसायिक गॅस सिलेंडर, ६ तोंडी नोझल, वजन व मीटर काटा असा एकूण १ कोटी ५५ लाखांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. गुजरातवरून जळगावच्या दिशेने येणारा हा अवैध साठा नेमका कोठून आला आणि महाराष्ट्रात हा काळाबाजार कोणाच्या फायद्यासाठी केला जाणार होता, याचा छडा लावण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत (Essential Commodities Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक पोलीस आणि पुरवठा विभागाचे पथक पुढील तपास अत्यंत गतीने करत असून अशा प्रकारच्या इंधन आणि गॅस तस्करांवर यापुढेही आणखी कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दक्षता पथकाचे प्रमुख चंद्रकांत डांगे यांनी दिला आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *