सोनवी पुलावर जीवघेण्या ‘वन-वे’ चा फटका; दोन गाड्यांची भीषण धडक, प्रवाशांचे प्राण टांगणीला

Gramin Varta
199 Views

संगमेश्वर / एजाज पटेल : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सोनवी पुलावर प्रशासनाने सुरू केलेल्या एकाच मार्गिकेवरील दुहेरी वाहतुकीच्या प्रयोगामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे. आज शुक्रवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास या धोकादायक वळणावर दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर अत्यंत भीषण धडक झाली. अपघाताची तीव्रता इतकी प्रचंड होती की, एका वाहनाचे मागील चाक निखळून बाहेर पडले आणि दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली असली, तरी या घटनेने प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा पर्दाफाश केला आहे.

सोनवी पुलाच्या एका बाजूचे काम घाईगडबडीत पूर्ण करून तेथून दुहेरी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय सध्या वाहनचालकांच्या जिवावर उठला आहे. पूल तीव्र वळणाचा असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज चालकांना येत नाही. आज गोव्याच्या दिशेने जाणारे वाहन एमएच ४३ एएल १७१५ आणि मुंबईच्या दिशेने येणारे वाहन एमएच ४७ सीडी ६९४७ हे याच वळणावर समोरासमोर आले. वेगावर नियंत्रण न राहिल्याने दोन्ही गाड्यांची जोरदार धडक झाली. गेल्या अवघ्या आठ दिवसांत या पुलावर झालेला हा तिसरा भीषण अपघात आहे. याआधी कंटेनर-टेम्पो आणि छोटा हत्ती-चारचाकी अशा दोन धडका होऊन काही जण जखमी झाले होते.

यापूर्वी स्थानिक वृत्तमाध्यमांनी एकाच मार्गिकेवरून दोन्ही बाजूंनी सुसाट वाहतूक सोडणे किती धोकादायक आहे, याची जाणीव करून दिली होती. मात्र, ठेकेदार आणि प्रशासनाने या इशाऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. दररोज शेकडो प्रवाशांचे प्राण धोक्यात घालून सुरू असलेला हा जीवघेणा कारभार थांबवून, जोपर्यंत काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत पुलावर वाहतूक नियंत्रक किंवा पोलीस कर्मचारी तैनात करून एकेरी वाहतूक वळवण्याची मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने न पाहिल्यास होणाऱ्या पुढील गंभीर दुर्घटनेला सर्वस्वी प्रशासन आणि महामार्ग ठेकेदारच जबाबदार असतील, असा संतप्त इशारा वाहनचालकांतून दिला जात आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *