रत्नागिरीच्या सायकलस्वाराने गाठले ‘माऊंट एव्हरेस्ट’चे शिखर; अथर्व शेंड्येची ऐतिहासिक कामगिरी

Gramin Varta
187 Views

रत्नागिरी : रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचा युवा सायकलपटू अथर्व शेंड्ये याने सायकलिंग क्षेत्रातील अत्यंत कठीण मानले जाणारे ‘एव्हरेस्टिंग’ यशस्वीरित्या पूर्ण करत जिल्ह्यासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. केवळ २० वर्षे वय असलेल्या अथर्वने रत्नागिरीजवळील टेंबेपूल ते चाळकेवाडी या मार्गावर तब्बल ७० वेळा चढ-उतार करत ४१ तासांत ५०० किलोमीटरहून अधिक सायकलिंग आणि १० हजार मीटरपेक्षा जास्त उंचीची चढाई पूर्ण केली. एव्हरेस्ट शिखराची उंची ८,८४८ मीटर आहे, आणि ही उंची सायकलिंगद्वारे गाठणे हे जागतिक स्तरावर सायकलस्वारांसाठी एक मोठे आव्हान मानले जाते. या विक्रमी कामगिरीमुळे अथर्वने रत्नागिरीच्या नावावर एक नवा इतिहास नोंदवला असून, कोकणात सायकलिंगच्या क्षेत्रातील एक नवीन दालन खुले केले आहे.

अथर्वच्या या साहसी मोहिमेत रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, टीम कोकण कोस्टल मॅरेथॉन आणि स्थानिक ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. नियमानुसार एव्हरेस्टिंग दरम्यान झोप घेता येत नसल्याने, ४१ तासांच्या या अखंड प्रवासात त्याला मानसिक आणि शारीरिक आधार देण्यासाठी क्लबच्या सदस्यांनी जागे राहून साथ दिली. या उपक्रमासाठी अथर्वने गेली दोन वर्षे कठोर परिश्रम घेतले होते. या यशाबद्दल बोलताना अथर्वने गणपतीपुळेच्या गणरायाचे आशीर्वाद आणि आपल्या कुटुंबाच्या तसेच क्लबच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाल्याचे सांगितले. या ऐतिहासिक कामगिरीमुळे रत्नागिरीत आता सायकलिंग टुरिझम आणि फिटनेस उपक्रमांना मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात असून, अथर्ववर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *