लांजात डेंग्यूचे दोन रुग्ण आढळताच नगरपंचायत प्रशासन अलर्ट; प्रत्येक प्रभागात फवारणीला सुरुवात

Gramin Varta
389 Views

लांजा/अरबाज नेवरेकर:-लांजा शहरात डेंग्यूचे दोन रुग्ण आढळून आल्याने लांजा नगरपंचायत प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील प्रत्येक प्रभागात औषध फवारणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून, सर्वत्र युद्धपातळीवर काम सुरू आहे.

या मोहिमेची पाहणी उपनगराध्यक्ष मिलिंद उर्फ बाबा लांजेकर करत असून, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली फवारणीची मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच शहरातील सर्व नगरसेवक आपल्या-आपल्या प्रभागात उपस्थित राहून फवारणी मोहिमेवर लक्ष ठेवत असून नागरिकांना आवश्यक सहकार्य करत आहेत.

नगराध्यक्षा सावली कुरूप यांनी नागरिकांना घाबरून न जाता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पिण्याचे पाणी उकळून वापरावे, घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नये, डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच ताप किंवा डेंग्यूची लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे त्यांनी सांगितले.

या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक सूरज जाधव, शहर समन्वयक रोहित कराळे, लिपिक संजय गुरव, स्वच्छता विभागाचे मुकादम रवींद्र कांबळे, नन्या कांबळे तसेच नगरपंचायतीचे सर्व स्वच्छता कर्मचारी सहभागी झाले असून, शहरातील प्रत्येक प्रभागात फवारणीचे काम सुरू आहे.

डेंग्यूचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून स्वच्छता राखावी आणि प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन नगरपंचायत प्रशासनाने केले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *