शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे लांजा तहसीलदारांचे आवाहन

Gramin Varta
152 Views

लांजा / फरहान पाटणकर: केंद्र व राज्य शासनाच्या विविध अर्थसाहाय्य योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी यापुढेही योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले डिजिटल लाइफ सर्टिफिकेट अर्थात हयातीचे प्रमाणपत्र ३० जून २०२६ पूर्वी सादर करावे, असे आवाहन लांजाच्या तहसीलदार प्रियांका ढोले यांनी केले आहे.

ग्रामीण विकास मंत्रालयाने लाभार्थ्यांचे हयातीचे विनाशुल्क प्रमाणपत्र ऑनलाइन तयार करण्यासाठी ‘Beneficiary Satyapan App’ विकसित केले आहे. या प्रणालीच्या माध्यमातून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ अर्थसाहाय्य योजना, संजय गांधी योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेंतर्गत लाभघेणाऱ्या लाभार्थ्यांना हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाइन सादर करता येणार आहे. हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाइन तयार करण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांचा आधार कार्ड व मोबाइल क्रमांक आवश्यक आहे.

ज्या लाभार्थ्यांना किंवा त्यांच्या नातेवाइकांना ऑनलाइन प्रमाणपत्र तयार करताना अडचणी येत असतील, त्यांनी आपल्या गावातील संबंधित ग्राम अधिकारी महसूल (तलाठी) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच तहसील कार्यालय, लांजा येथील संजय गांधी शाखेत ३० जून २०२६ पूर्वी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहूनही हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे.

शासनाच्या योजनांचा लाभ अखंडितपणे सुरू राहण्यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी मुदतीपूर्वी हयातीचे प्रमाणपत्र सादर करून महसूल प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार प्रियांका ढोले यांनी केले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *