पाचल (अंकुश पोटले): लांजा तालुक्यातील कोंडगे, कुरंग आणि झर्ये या तीन गावांचा वीजपुरवठा गेल्या तीन दिवसांपासून खंडित झाला होता. २३ जून रोजी झालेल्या मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यामुळे कोंडगे परिसरातील वीज खांब जमीनदोस्त झाले होते, ज्यामुळे संपूर्ण भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते.
वीज नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत होते. या बिकट परिस्थितीत ठाकरे गटाचे युवा नेते सचिन बेर्डे यांनी तातडीने दखल घेत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधून दुरुस्तीच्या कामाचा पाठपुरावा केला. त्यांच्या मागणीनंतर महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पावसाळी वातावरण आणि निसरडी जमीन अशा प्रतिकूल परिस्थितीतही वीज कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत दुरुस्तीचे काम हाती घेतले.
या महत्त्वपूर्ण कामात संतोष कदम, परशुराम साळुंखे आणि राजा बेर्डे यांसह स्थानिक ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत वीज कर्मचाऱ्यांना मोलाचे सहकार्य केले. ग्रामस्थांच्या या सक्रिय सहभागामुळे दुरुस्तीचे काम वेगाने मार्गी लागले. अखेर २५ जून रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास तिन्ही गावांचा वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात यश आले. अंधारात असलेल्या घरांमध्ये पुन्हा विद्युत प्रकाश पडताच ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. संकटकाळात जनतेच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी लोकसेवा असल्याची प्रतिक्रिया सचिन बेर्डे यांनी व्यक्त केली. या कामगिरीबद्दल महावितरणचे कर्मचारी आणि संबंधित लोकप्रतिनिधींचे परिसरातून कौतुक केले जात आहे.
