रत्नागिरीत आणीबाणीच्या सत्याग्रहींचा खासदार नारायण राणेंच्या हस्ते सन्मान

Gramin Varta
76 Views

रत्नागिरी : आणीबाणीविरोधातील लढा हा केवळ एक राजकीय निषेध नव्हता, तर तो देशाच्या लोकशाही रक्षणासाठी केलेला सर्वोच्च त्याग होता, अशा भावना रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केल्या. ‘संविधान हत्या दिना’निमित्त भारतीय जनता पक्षातर्फे रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या स्थानिक सत्याग्रहींचा खासदार राणे यांच्या हस्ते कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. आणीबाणीच्या त्या काळातील संघर्षाची आठवण करून देताना, राणे यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींवर टीका करत, सत्तेच्या स्वार्थासाठी घटनेचा गैरवापर केल्याचा आरोप केला. ज्या लाखो कार्यकर्त्यांनी गुन्ह्याशिवाय शिक्षा भोगली, तेच खऱ्या अर्थाने देशाचे रक्षक ठरले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात विवेक भावे, डॉ. संजय केतकर, दत्तात्रय रानडे, दामोदर गाडगीळ, गोपाळकृष्ण रायकर, प्रकाश आमकर, अनिरुद्ध ठाकूर, तुकाराम तोसकर आणि शिवराम ठीक यांसह अनेक ज्येष्ठ सत्याग्रहींचा गौरव करण्यात आला. यावेळी आणीबाणीच्या काळातील दाहकता अधोरेखित करण्यासाठी एक विशेष ध्वनिचित्रफीत दाखवण्यात आली आणि त्या काळातील घटनांचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते. रत्नागिरी जिल्ह्यातून सुमारे १८० जणांनी या आंदोलनात सहभाग घेत तुरुंगवास भोगला होता, ही माहिती यावेळी देण्यात आली.

आपला अनुभव सांगताना ज्येष्ठ सत्याग्रही विवेक भावे यांनी तुरुंगातील अमानवीय वागणूक आणि संघर्षाचे दिवस उलगडले. रा. स्व. संघावर बंदी असताना छुप्या पद्धतीने पत्रके वाटणे आणि त्यातून लोकशाहीचा आवाज बुलंद ठेवण्यासाठी सोसलेल्या यातना याबद्दल त्यांनी माहिती दिली. आणीबाणीत ढेकणांचा त्रास, निकृष्ट आहार आणि पोलिसांचा दबाव सहन करूनही आम्ही खचलो नाही, अशा शब्दांत त्यांनी त्या काळातील जिद्द सांगितली. लोकशाही अधिक सक्षम करणे ही आजच्या काळाची मोठी गरज असल्याचे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला ओंकार फडके, अभय चितळे आणि राजू भाटलेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *