दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर आरोग्य महोत्सवाचे आयोजन; १५ ते २२ जुलै दरम्यान विशेष शिबिरे

Gramin Varta
86 Views

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिक, विशेषतः ग्रामीण आणि दुर्बल घटकांतील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून १५ ते २२ जुलै या कालावधीत राज्यभरात आरोग्य तपासणी आणि विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या उपक्रमाची घोषणा केली असून, या शिबिरांच्या माध्यमातून कर्करोग, असंसर्गजन्य आजार आणि रक्ताची कमतरता यांसारख्या समस्यांवर मात करण्याचा शासनाचा निर्धार आहे.

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमार्फत राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेत रक्तदान, मुख, स्तन आणि गर्भाशय मुख कर्करोग तपासणी, तसेच हाडांची घनता (बोन मिनरल डेन्सिटी) तपासणी यांसारख्या महत्त्वाच्या आरोग्य सेवांचा समावेश आहे. शिबिराच्या ठिकाणी तपासणीसोबतच उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये गरजेनुसार शस्त्रक्रियांची सोयही करण्यात येणार आहे. तसेच, कोल्हापूर आणि बारामती येथे डॉ. मुफ्फजल लकडावाला यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्बिणीद्वारे हर्निया शस्त्रक्रिया व स्थूलता तपासणी शिबिर, तर व्हेरिकोज व्हेन्ससाठी विशेष उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्तरावर अधिष्ठातांच्या अध्यक्षतेखाली विशेष समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्या शिबिरांचे नियोजन, समन्वय आणि अहवाल सादरीकरणाची जबाबदारी पार पाडतील. याशिवाय, अवयव प्रत्यारोपण आणि गंभीर शस्त्रक्रियांसाठी सीएसआर (CSR) फंडातून मदत घेण्याचे निर्देशही मंत्री मुश्रीफ यांनी दिले आहेत. शिबिरांच्या काळात जनजागृती मोहिमांवर भर दिला जाणार असून, यामध्ये स्तनपान, मधुमेह, हृदयविकार, थॅलेसेमिया आणि तंबाखूमुक्ती यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. वृक्षारोपण आणि स्वच्छता यांसारख्या उपक्रमांनी शिबिरांना जोड देण्यात येणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *