लांजा : पालडी धनगरवाडी ते डोलर खिंड रस्ता वर्क ऑर्डर, जमीन मालकांची परवानगी नसताना काम सुरू

Gramin Varta
474 Views

सार्वजनिक बांधकाम विभागालाही माहिती नसल्याचा ग्रामस्थांचा दावा; कामाची चौकशी व स्थगितीची मागणी

लांजा : तालुक्यातील हर्दखळे गावातील पालडी धनगरवाडी ते डोलर खिंड या रस्ता कामावरून ग्रामस्थांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सदर काम कोणतीही आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता सुरू करण्यात आल्याचा आरोप हर्दखळे ग्रामविकास मंडळाचे ग्रामस्थ गणेश गुरव आणि प्रशांत सिताराम गुरव यांनी केला आहे.

याबाबत त्यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती लांजा यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाकडेही निवेदन सादर करून चौकशीची मागणी केली आहे. या रस्ता कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागालाही कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे. यावेळी हर्दखळे ग्रामविकास मंडळाचे ग्रामस्थ गणेश गुरव, प्रशांत सिताराम गुरव व पदाधिकारी उपस्थित होते.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रस्ता काही खाजगी जमिनीमधून जात असून संबंधित जमीन मालकांची लेखी संमती किंवा परवानगी घेण्यात आलेली नाही. तसेच प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मंजुरी, निविदा प्रक्रिया व वर्क ऑर्डर याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

सुमारे ३० लाख रुपयांच्या शासकीय निधीच्या कामाबाबत ग्रामसभेत कोणतीही चर्चा किंवा ठराव झालेला नसल्याचा आरोप ग्रामविकास मंडळाने केला आहे. तसेच रस्त्याच्या खडीकरणाच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे सांगत कामाच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित काम थांबवावे, कंत्राटदाराला कोणतेही देयक अदा करू नये आणि नियमबाह्य कामात सहभागी असलेल्या संबंधित अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

याप्रकरणी तातडीने कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा हर्दखळे ग्रामविकास मंडळाचे ग्रामस्थ गणेश गुरव, प्रशांत सिताराम गुरव व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Total Visitors :
4833916
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *