लांजा येथे मोहरम ताजिया (ताबूत) मिरवणूक भक्तिभावात;हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन

Gramin Varta
886 Views

लांजा/ अरबाज नेवरेकर :- मुस्लिम धर्मातील चार पवित्र महिन्यांपैकी एक असलेल्या मोहरम महिन्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. हा महिना शोक, त्याग, संयम आणि सत्यासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करण्याचा मानला जातो. करबला येथे हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अन्यायाविरुद्ध दिलेल्या सर्वोच्च बलिदानाच्या स्मरणार्थ मुस्लिम बांधव मोहरम पाळतात. या कालावधीत दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रम, मजलिस, प्रार्थना आणि ताजियाची प्रतिष्ठापना केली जाते. दहाव्या दिवशी (आशुरा) ताजिया (ताबूत) मिरवणुकीद्वारे इमाम हुसेन यांच्या बलिदानाला अभिवादन केले जाते.

लांजा शहरातही गेले दहा दिवस धार्मिक वातावरणात विविध कार्यक्रम पार पडले. त्यानंतर मोहरमनिमित्त ताजिया (ताबूत) मिरवणूक भक्तिभावात काढण्यात आली. सय्यद चांदशाह बुखारी दर्गा, लांजा येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला. ही मिरवणूक जुनी बाजारपेठ मार्गे तलाव परिसरात नेण्यात आली. तेथे धार्मिक परंपरेनुसार ताजिया थंड करण्यात आला. त्यानंतर जामा मशीद,चव्हाटा मंदिर ,सोनार गल्ली मार्गे पुन्हा ताजिया सय्यद चांदशाह बुखारी दर्गा येथे आणून धार्मिक विधींनी सांगता करण्यात आली.

मिरवणुकीदरम्यान हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडले. दोन्ही समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि परस्पर सौहार्दाचा संदेश दिला.

मिरवणूक शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यावेळी सर्व मानकरी तसेच हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रद्धा, शिस्त, त्याग आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी ही मोहरम ताजिया मिरवणूक शांततापूर्ण वातावरणात संपन्न झाली.

Total Visitors :
4577092
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *