गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर लवकरच ‘लाइफ सेव्हर’ रोबोट; बुडणाऱ्यांना काही क्षणांत आणणार किनाऱ्यावर!

Gramin Varta
257 Views

जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांचा रोबोटिक आपत्ती वॉटर क्राफ्ट’साठी प्रस्ताव

रत्नागिरी : राज्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लवकरच अत्याधुनिक ‘रोबोटिक आपत्ती वॉटर क्राफ्ट’ यंत्रणा कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी यासंदर्भातील सविस्तर अहवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीसमोर सादर केला आहे. गणपतीपुळे येथे संभाजीनगर येथील 5 तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी गांभीर्याने लक्ष देत आपत्ती व्यवस्थापनाकडे रोबोट यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे.

गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत असतात. मात्र, समुद्रातील भरती-ओहोटी, अचानक निर्माण होणारे प्रवाह, पाण्याचा करंट आणि निष्काळजीपणामुळे अनेक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रोबोटिक वॉटर रेस्क्यू प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे बगाटे यांनी म्हटले आहे.
ही अत्याधुनिक यंत्रणा रिमोटच्या सहाय्याने नियंत्रित केली जाते. समुद्रात एखादी व्यक्ती बुडत असल्याचे लक्षात येताच हा रोबोट अत्यंत वेगाने त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो आणि बुडणाऱ्या व्यक्तीला सहज उचलून सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणतो. यामुळे जीवितहानी टळते. त्याचबरोबर बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवण्यासाठी जाणारी मानवी हानीही टळणार आहे.

विशेष म्हणजे, या रोबोटची वहन क्षमता एका प्रौढ व्यक्तीचे वजन सहज पेलू शकते. खराब हवामान, प्रचंड लाटा किंवा धोकादायक समुद्री परिस्थितीतही हा रोबोट प्रभावीपणे कार्य करू शकतो. त्यामुळे बचाव पथकांच्या जीवितालाही धोका कमी होणार आहे.

“हा रोबोट बुडणाऱ्या व्यक्तीपर्यंत काही सेकंदांत पोहोचून तिला सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्यास सक्षम आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही यंत्रणा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे,” अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

दरम्यान, गणपतीपुळेसारख्या पर्यटनस्थळी ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यास समुद्रातील दुर्घटनांमध्ये मोठी घट होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही होत आहे.

Total Visitors :
4577048
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *