ब्रेकिंग: उद्या होणारी ‘टीईटी’ परीक्षा अखेर रद्द! पेपर फुटल्याने खळबळ

Gramin Varta
355 Views

मुंबई:महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे उद्या (दि. २८) आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. अगदी काही तास शिल्लक असताना पेपर फुटल्यामुळे परीक्षा रद्द करावी लागली आहे.

या परीक्षेला सुमारे साडेचार लाख विद्यार्थी बसले होते. दोन सत्रात दोन विभागात ही परीक्षा होणार होती.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत उद्या (दि.२८) संपूर्ण राज्यात एकूण १०२८ केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित करण्यात आली होती. NEET २०२६ च्या परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केलेल्या होत्या. मात्र, आज (दि.२७) पहाटेच्या सुमारास गोपनिय माहितीच्या आधारे भिवंडी येथील काही व्यक्तींकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलीसांनी धाड घातली.

यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता, सदर इसमांकडे शिक्षक पात्रता परीक्षा जून २०२६ परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्याने भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

यानंतर उद्या आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणेच व्हावी हा परीक्षा परिषदेचा आग्रह असल्याने व याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाटत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे राज्य परीक्षा परिषदेने एका निवेदनात म्हटले आहे.

Total Visitors :
4827610
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *